किन्ही ग्रामस्थांचा बीएसएनएल कार्यालयात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:40+5:302021-06-17T04:15:40+5:30
पारनेर : तालुक्यातील किन्ही, बहिरोबावाडी, पिंपळगाव तुर्क, करंदी या गावांना दूरसंचार सेवा देणाऱ्या बीएसएनएल कंपनीचा मनोरा गोरेगाव घाटमाथ्यावर आहे. ...
पारनेर : तालुक्यातील किन्ही, बहिरोबावाडी, पिंपळगाव तुर्क, करंदी या गावांना दूरसंचार सेवा देणाऱ्या बीएसएनएल कंपनीचा मनोरा गोरेगाव घाटमाथ्यावर आहे. हा मनोरा मागील पंधरा ते वीस दिवसांपासून वारंवार बंद पडत आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी किन्ही, बहिरोबावाडी गावातील नागरिकांनी शेतकरी नेते अनिल देठे पाटील व उपसरपंच हरेराम ऊर्फ मिठू खोडदे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर येथील उपमंडल अभियंता समीर मल्लेभारी यांच्या दालनात एक तास ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान श्री. मल्लेभारी यांनी वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून शनिवार (दि.१९) जूनपर्यंत मनोऱ्याच्या संपूर्ण दुरुस्तीची कामे पूर्ण करून दूरसंचार सेवा अखंडपणे सुरू केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी निवेदन देऊन आंदोलन स्थगित केले.
यावेळी किन्हीचे माजी सरपंच विठ्ठल खोडदे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग व्यवहारे, रामदास देठे, सुनील साबळे, राजू देठे, सुनील खोडदे, संदीप व्यवहारे, प्रताप खोडदे आदी उपस्थित होते.
--
किन्ही येथील बीएसएनएलचा मनोरा वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे बीएसएनएलने याची गांभीर्याने दखल घेऊन हा मनोरा दिलेल्या मुदतीत दुरुस्त करावा; अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
-अनिल देठे,
शेतकरी नेते, पारनेर