भनगडेवाडीचा गणेश झाला जर्मनीचा जावई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 05:30 PM2018-12-19T17:30:06+5:302018-12-19T17:30:29+5:30
पारनेर तालुक्यातील भनगडेवाडी (ढवळपुरी) सारख्या अत्यंत दुर्गम व दुष्काळी भागातील एक तरूण चक्क जर्मनीचा जावई झाला.
भाळवणी : पारनेर तालुक्यातील भनगडेवाडी (ढवळपुरी) सारख्या अत्यंत दुर्गम व दुष्काळी भागातील एक तरूण चक्क जर्मनीचा जावई झाला. भनगडेवाडी येथील गणेश पठारे आणि जर्मनीची कॅथरिना इटस्कॉवीच यांनी मराठमोळ््या पध्दतीने जन्मगाठ बांधली.
भनगडेवाडी (ढवळपुरी) येथील शेतकरी तुकाराम रखमा पठारे यांचा मुलगा गणेश हा उच्चशिक्षण घेण्यासाठी जर्मनीला गेला. पीएचडीचे शिक्षण घेत असताना डॉक्टर तरूणी कॅथरिना यांची मैत्री झाली. दोघांनीहीएकमेकांना साथ देत लग्न करण्याचे ठरविले. प्रथम गणेशच्या घरच्यांना ही गोष्ट रुचली नाही. परंतु काही कालावधीनंतर त्यांनी या लग्नास होकार दिला. तर कॅथरिनाची आई लारिया व वडील व्हीक्टर इटस्कॉवीच यांनी या लग्नाला संमती दिली. हिंदू धर्मशास्राप्रमाणे मराठमोळ्या पद्धतीने हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी जर्मनीहून कॅथरिनाचे सुमारे ३० ते ३५ नातेवाईक तीन दिवसांपासून या सोहळ्यासाठी भनगडेवाडी येथे आले होते.
भनगडेवाडी येथील नवरदेव गणेश व कॅथरिना यांची गावातील मंदिरापासून मंगल कार्यालयापर्यंत सुमारे एक किमी अंतरावर मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीत सहभागी झाले होते.