काष्टीतील सोनाली देतेय मृत्यूशी झुंज; वडील, चुलतेही झाले किडनीच्या आजाराचे शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 06:30 PM2018-01-22T18:30:41+5:302018-01-22T18:34:22+5:30
सोनाली कोकाटे ही काष्टी येथील रहिवासी. तिचे वडील, चुलते, आत्या हे सर्व किडनी आजाराच्या शिकार झाले. या किडनीच्या आजाराने सर्व कुटुंबालाच गिळले असताना आता मागे राहिलेल्या सोनाली कोकाटे हिलाही या आजाराने विळखा घातला आहे.
बाळासाहेब काकडे
काष्टी : सोनाली कोकाटे ही काष्टी येथील रहिवासी. तिचे वडील, चुलते, आत्या हे सर्व किडनी आजाराच्या शिकार झाले. या किडनीच्या आजाराने सर्व कुटुंबालाच गिळले असताना आता मागे राहिलेल्या सोनाली कोकाटे हिलाही या आजाराने विळखा घातला आहे. आता महाविद्यालयीन शिक्षण घेऊन झेप घेण्याच्या तयारीत असलेल्या काष्टी येथील सोनाली रंगनाथ कोकाटे हिला गेल्या दीड वर्षापासून किडनी आजाराने ग्रासले आहे. दोन्ही किडन्या निकाम्या झाल्याने सोनालीवर औरंगाबाद येथील एका खासगी हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत. उपचारासाठी किडनी ट्रान्स्फरसाठी किमान सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
घरात आई असून, चौथीत शिकणारा भाऊ आहे. सोनाली महाविद्यालय सोडून दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे कोकाटे कुटुंबासमोर अडचणी आणि आव्हानाचा डोंगरच उभा राहिला आहे. सोनाली ही श्रीगोंदा येथील जिवाजीराव कॉलेजमध्ये एस.वाय.बीए मध्ये शिक्षण घेणारी अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे. तिची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. मात्र कुटुंबात कमविणारे कोणी नाही. जे कुटुंबाचे आधार होते, तेही जग सोडून गेल्यामुळे आधाराला आता फक्त आई आणि लहान भाऊ आहे. काष्टी येथील सिद्धिविनायक बचत गटातील मानवतावादी भावनेतून सोनालीला दत्तात्रय पाचपुते, डॉ. संजय कोकाटे, आजिनाथ कोकाटे, डॉ. संदीप कोकाटे, प्रमोद शिंदे, मारुती कोकाटे, सुनील कोकाटे, नवनाथ कोकाटे, शांताराम कोकाटे, नितीन कोकाटे, डॉ. विजय ठुबे यांनी एकत्र येऊन सुमारे १८ हजारांची मदत केली आहे. तिला आणखी मदतीची गरज आहे.