सोनई हत्याकांडातील आरोपीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:08 PM2018-06-23T13:08:34+5:302018-06-23T13:09:53+5:30
सोनई हत्याकांडातील आरोपी पोपट दरंदले याचा शनिवारी सकाळी नाशिक मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला आहे. पोपट दरंदले याला सोनई हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
अहमदनगर: सोनई हत्याकांडातील आरोपी पोपट दरंदले याचा शनिवारी सकाळी नाशिक मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला आहे. पोपट दरंदले याला सोनई हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तुरुंगात असताना पोपटला ह्रदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी दरंदले यास मृत घोषित केले.
नेवासा फाटा येथील बी.एड. महाविद्यालयातील एका सवर्ण मुलीचे मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू (२३) या मुलाशी प्रेमसंबंध होते. हे दोघेही विवाह करतील, असा संशय मुलीच्या कुटुंबीयांना होता. यामुळे त्यांनी सचिनची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. स्वच्छतागृहाची टाकी साफ करण्याच्या बहाण्याने विठ्ठलवाडी येथे दरंदले वस्तीवर सचिनला बोलावण्यात आले. सचिन हा राहुल ऊर्फ तिलक राजू कंडारे (२६) आणि संदीप राजू थनवार (२४) या दोघा मित्रांसह तेथे आला. टाकी स्वच्छतेचे काम सुरू असतानाच या तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. विळा आणि चारा कापण्याच्या अडकित्त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. १ जानेवारी २०१३ रोजी हे हत्याकांड घडले होते. स्वच्छतागृहाच्या टाकीत पडून सचिनचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता.
५ जानेवारी २०१३ ला याप्रकरणी सातजणांना अटक करण्यात आली होती. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणा-ाा या हत्याकांडातील सहा दोषींना जानेवारी महिन्यात नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली होती.