सोनई तिहेरी हत्याकांड : त्याने प्रेम केले... त्याच्यासह मित्रांचेही आयुष्य संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 08:28 PM2018-01-15T20:28:44+5:302018-01-16T04:46:36+5:30

ती उच्च शिक्षित... तो साधा शिपाई.. दोघांची ओळख झाली... ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. बहरलेल्या प्रेमातून लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. नियतीला मात्र ते मान्य नव्हते. मुलीचे प्रेमप्रकरण घरापर्यंत जाताच...

 Soni Tirli murder: He loved ... The life of his friends ended with him | सोनई तिहेरी हत्याकांड : त्याने प्रेम केले... त्याच्यासह मित्रांचेही आयुष्य संपले

सोनई तिहेरी हत्याकांड : त्याने प्रेम केले... त्याच्यासह मित्रांचेही आयुष्य संपले

अहमदनगर : ती उच्च शिक्षित... तो साधा शिपाई.. दोघांची ओळख झाली... ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. बहरलेल्या प्रेमातून लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. नियतीला मात्र ते मान्य नव्हते. मुलीचे प्रेमप्रकरण घरापर्यंत जाताच तिच्या वडिलांसह भाऊ आणि चुलत्यांनी त्या प्रियकरासह त्याच्या दोन मित्रांनाही अमानूषपणे मारून टाकले.

पाच वर्षांपूर्वी प्रेमप्रकरणातून जिल्ह्यातील सोनई (ता. नेवासा) येथे घडलेल्या भीषण तिहेरी हत्याकांड खटल्यात सोमवारी नाशिक जिल्हा न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी धरले. दोषी ठरलेल्या या सहापैकी पाच आरोपी एकाच कुटुंबातील आहेत. या दोषींना आता न्यायालय काय शिक्षा ठोठावते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पाच वर्षापूर्वी सोनई येथील दरंदले कुटुंबातील मुलगी नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात बी. एडचे शिक्षण घेत होती. याच संस्थेत शिपाई म्हणून कार्यरत असलेला सचिन सोहनलाल घारू आणि तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेम प्रकरणाची कुणकुण मुलीच्या कुटुंबीयांना लागली. कनिष्ठ जातीतील मुलावर प्रेम केल्याने संतापलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी सचिनला संपविण्याचा निर्णय घेतला. १ जानेवारी २०१३ रोजी शौचालयाचे सेफ्टी टँक दुरूस्तीचा बहाणा करून व जास्त मजुरीचे आमिष दाखवून सचिन याच्यासह संदीप राजू थनवार व राहुल कंडारे (सर्व रा. गणेशवाडी ता. नेवासा) यांना सोनई जवळील विठ्ठलवाडी येथे बोलावून घेतले. तेथे संदीप थनवार याला शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये बुडवून मारले. 

राहुल व सचिन यांचे कोयत्याने व वैरण कापण्याच्या अडकित्याने तुकडेतुकडे करून हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सदर मुलीचे वडील पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कु-हे (मावसभाऊ), नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पुरावे न मिळाल्याने रोहिदास फलकेवर न्यायायालयात दोष सिद्ध होऊ शकला नाही.

‘ती’ फितूर झाली

सचिन घारू याचे ज्या मुलीवर प्रेम होते, ती मुलगी या खटल्यातील महत्त्वपूर्ण साक्षीदार होती. न्यायालयात मात्र सरतपासणी आणि उलटतपासणीदरम्यान ही मुलगी काहीच बोलली नाही. त्यामुळे तिला फितूर म्हणून घोषित करण्यात आले.

तपास सीआयडीकडे

या हत्याकांडाच्या तपासात राजकीय हस्तक्षेपामुळे सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. प्रथम अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल पाच दिवसांनंतर दलित अत्याचार प्रतिबंधक कलम लावण्यात आले. या प्रकरणाचा प्रथम तपास सोनई पोलीस त्यानंतर श्रीरामूर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने केला. दलित संघटनांनी केलेल्या मागणीनुसार हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर सीआयडीनेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

फलकेचा कटात सहभाग नसल्याचे उघड

सोनई हत्याकांडात दरंदले यांचा नातेवाईक अशोक फलके याच्यावर कट रचल्याचा आरोप होता. मात्र, पोलिसांनी जप्त केलेला लाकडी दांडा व त्याचे रासायनिक विश्लेषण केलेले नसल्याने रक्ताचे डाग आढळून आले नाही. तसेच या परिसरात असलेला मोबाईल टॉवर हा दहा किलोमीटर परिसर व्यापत असल्याने फलके हा घटनास्थळी हजर असल्याचे वा कट रचल्याचे पुरावे नसल्याचे त्याचे वकील अ‍ॅड. राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने हे पुरावे ग्राह्य धरून फलके यास या खटल्यात निर्दोष ठरविले.

वृद्धावस्थेतील एकुलता एक सहारा असलेल्या माझ्या सचिनचा अत्यंत निर्दयपणे खून केला. या सर्वांना न्यायालयाने फाशीचीच शिक्षा द्यावी. या उतारवयात मला माझ्या मुलीकडे दिवस काढावे लागत आहेत. मुलगा असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती.
- कलाबाई घारू, मयत सचिन घारूची आई

माझ्या भावाचा निर्दयपणे खून करणा-यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून भावाच्या आत्म्याला शांती मिळेल़ या घटनेनंतर घरी आलेल्या मंत्र्यांनी आर्थिक मदत, तसेच नोकरीचे आश्वासन दिले, मात्र चार वर्षे होऊनही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही़
- सागर कंडारे, मयत राहुल कंडारेचा भाऊ

भावाचा निर्दयपणे खून होण्याच्या घटनेला चार वर्षे झाली असून, न्यायालयाने यातील सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी. आई व माझा सचिन हा एकमेव सहारा होता. आईला सध्या मी सांभाळत असले, तरी भावाची उणीव कायमस्वरूपी राहणार आहे.
- रिनाबाई घारू, मयत सचिन घारूची बहीण

Web Title:  Soni Tirli murder: He loved ... The life of his friends ended with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.