नगर तहसील कार्यालयाचे लवकरच विभाजन
By Admin | Published: May 15, 2016 11:59 PM2016-05-15T23:59:16+5:302016-05-16T00:09:43+5:30
अहमदनगर : नगर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.
अहमदनगर : नगर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. तहसील कार्यालयाचे विभाजन करून शहरासाठी स्वतंत्र्य अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत मंत्री खडसे यांनी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत.
प्रस्ताव मिळाल्यास त्याला तत्काळ मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन खडसे यांनी दिल्याची माहिती भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली आहे. महसूलमंत्री खडसे शनिवारी नगर येथे आले होते. त्यावेळी प्रा. बेरड यांनी खडसे यांच्याशी तहसील कार्यालयाच्या विभाजनाबाबत चर्चा केली. तसेच याबाबत निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक सचिन पारखी, सदा देवगावकर, अॅड. युवराज पोटे यांची उपस्थिती होती.
या निवेदनात म्हटले आहे, नगर शहर आणि तालुका एकाच तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येतात. त्यामुळे या कार्यालयावर कामाचा प्रचंड ताण येतो. नागरिकांना सेवा चांगल्याप्रकारे मिळत नाहीत. शहर आणि तालुक्याची लोकसंख्या दहा लाखाच्यावर गेली आहे. गतिमान प्रशासनासाठी अप्पर तहसील कार्यालय असणे आवश्यक आहे. शहर आणि तालुक्यातील नागरिक आणि विद्यार्थी यांनाही कार्यालय सोयीस्कर होईल.
(प्रतिनिधी)