आंबट चिंचेचा शेतकऱ्यांना मिळतोय आर्थिक गोड लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:19 AM2021-03-28T04:19:07+5:302021-03-28T04:19:07+5:30
बोधेगाव : ग्रामीण भागात शेताच्या बांधावर कमी पाण्यावर अवलंबून असणारी चिंचेची बहुतांश झाडे सर्रासपणे आढळून येतात. या झाडांना लगडलेल्या ...
बोधेगाव : ग्रामीण भागात शेताच्या बांधावर कमी पाण्यावर अवलंबून असणारी चिंचेची बहुतांश झाडे सर्रासपणे आढळून येतात. या झाडांना लगडलेल्या चिंचेपासून शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. सध्या चिंचा झोडाझोडीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना साधारणपणे प्रतिझाड २ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
साधारणपणे जून-जुलै महिन्यात चिंचेला फुलोरा येतो. त्यानंतर चिंचा लागून मार्चपर्यंत त्यांची पूर्ण वाढ होते. यंदा अनुकूल हवामान व पावसामुळे झाडांना गतवर्षीपेक्षा अधिक चिंचा लगडलेल्या दिसून येत आहेत. सध्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात झाडांवरील चिंचा झोडण्याचे काम सुरू आहे. येथील नवाबभाई बागवान, चाँदभाई शेख, मेहमूद शेख, युन्नुस शेख, महेमूद बागवान, रियाज बागवान, आदम सय्यद, अल्लाबकस बागवान, करिम बागवान आदी व्यापारी चिंचेचा व्यवसाय करतात. जेव्हा चिंचेची झाडे फुलोऱ्यात असतात त्या वेळी व्यापारी झाडे पाहून सौदा करतात. नवरात्रीच्या दरम्यान संबंधित शेतकऱ्यांना २० टक्के रक्कम इसार म्हणून देत झाडे बुक केली जातात. त्यानंतर मार्चमध्ये झाडांवर चढून चिंचा तोडण्यासाठी ६०० रुपये मजुरीने ५ मजूर, गोळा करण्यासाठी २५० रुपये मजुरीने १० महिला मजूर, गाडी भाडे ५०० रुपये, चिंचा फोडण्यासाठी १६० रुपये पायली चिंचोके आदी खर्च येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना प्रतिझाड सरासरी २ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो. यामुळे बांधावरील चिंचेचे झाड शेतकऱ्यांसाठी विनाखर्च आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरत आहे.
---
बाजारपेठेत असा मिळतो भाव.. (प्रतिक्विंटल रुपयात)
टरफलाची चिंच : १५०० ते २०००, फोडलेली चिंच : ५००० ते ७०००, चिंचोके : १५०० ते १६००
---
शेतातील बांधावर लहान-मोठी १०-१२ चिंचेची झाडे आहेत. यापासून दरवर्षी २० ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. कुठलाही खर्च न करता या बांधावरील झाडांपासून आर्थिक फायदा होतो.
- भिमा पानखडे,
शेतकरी, बोधेगाव
--
या वर्षी परिसरातील जवळपास दीडशे ते दोनशे चिंचेच्या झाडांचा सौदा केलेला आहे. चालू हंगामात चिंचेचे उत्पादन वाढल्याने बाजारपेठेत चिंचेचे दर निम्म्याने घटले आहेत. अवकाळी पावसामुळेही चिंचेचे नुकसान झाले आहे.
- नवाबभाई बागवान,
चिंचेचे व्यापारी, बोधेगाव
---
२७बोधेगाव चिंचा
बोधेगाव येथील शेताच्या बांधावरील झाडाच्या चिंचा झोडताना व्यापारी नवाबभाई बागवान, कामगार व महिला मजूर.