सुप्यातील आरोग्य उपकेंद्राच्या आधुनिकीकरणात जागेची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:18+5:302021-01-09T04:17:18+5:30
सुपा : सुपा (ता. पारनेर) येथील आरोग्य उपकेंद्राच्या आधुनिकीकरणात जागेचा अडसर निर्माण होत असून तीन दशकांपूर्वीची ही इमारत आता ...
सुपा : सुपा (ता. पारनेर) येथील आरोग्य उपकेंद्राच्या आधुनिकीकरणात जागेचा अडसर निर्माण होत असून तीन दशकांपूर्वीची ही इमारत आता कात टाकणार आहे. आरोग्य उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ४ लाख ८० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात जिल्हा नियोजन मंडळाच्या व जिल्हा परिषदेच्या सदस्या राणी लंके यांना यश मिळाले.
आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची दुरुस्ती, रंगकाम, स्वच्छतालय, फरशी, दरवाजे, खिडक्या आदी कामे यातून झाल्यावर उपकेंद्र चकाचक होईल; परंतु उपलब्ध जागेत संगणक कक्ष व तपासणी, उपचार करण्यासाठी लागणारी उपकरणांची मांडणी करून त्याचा रुग्णांना लाभ देण्यासाठी लागणारी जागा या इमारतीत नसल्याने वाढत्या लोकसंख्येच्या या गावचे झपाट्याने शहरीकरण होत असताना सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणे त्यांना लागणाऱ्या सेवा, सोयी, सुविधा पुरवणे जागेअभावी अशक्य होणार आहे.
भविष्याचा विचार करता आहे त्या जागेवर तीन- चार मजली इमारत बांधणे ही काळाची गरज असल्याचे ग्रामस्थानी सांगितले. सध्या काही काळापुरते या जागेत जर आरोग्यविषयक सेवा देण्याचा प्रयत्न केला तरी भविष्यात सुपा एमआयडीसीतील कारखाने, सीएसआर फंडाच्या माध्यमातून या आरोग्य उपकेंद्राला भरीव मदत करून अनेक उपयुक्त वैद्यकीय उपकरणे देतील. त्यांना ठेवण्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी लागणारी जागा हवी. त्यासाठी आतापासून नियोजन करून आगामी काळात नवीन इमारत बांधावी लागणार आहे. आठवडे बाजारच्या दिवशी येथे अनेक वाहने उभी असतात. त्यामुळे येथे संरक्षक भिंत होणे गरजेचे आहे. जागेअभावी येथे असलेला कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर यांचा वापर करता येत नसल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मिळाली.
फोटो ०८ सुपा
पारनेर तालुक्यातील सुपा येथील आरोग्य उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे.