सभापती, उपसभापती निवड वादात
By Admin | Published: September 16, 2014 01:08 AM2014-09-16T01:08:57+5:302024-04-10T15:50:19+5:30
पाथर्डी : सभापती उषाताई अकोलकर व त्यांचे पती विष्णुपंत अकोलकर यांनी मला त्यांच्या गाडीत बसवून घरी नेले व मला मतदानापासून वंचित ठेवले,
पाथर्डी : सभापती उषाताई अकोलकर व त्यांचे पती विष्णुपंत अकोलकर यांनी मला त्यांच्या गाडीत बसवून घरी नेले व मला मतदानापासून वंचित ठेवले, असा जबाब पंचायत समिती सदस्या कलावती गवळी यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिला आहे़यामुळे तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक वादात सापडली आहे़
रविवारी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी झाल्या. पंचायत समितीत एकूण आठ सदस्य असून, यामध्ये माजी आ.राजीव राजळे यांना मानणारे चार तर प्रताप ढाकणे यांना मानणारे तीन व एक सदस्य मनसेचा होता. राजळे गटातर्फे सभापतीपदासाठी संभाजी पालवे तर उपसभापती पदासाठी देविदास खेडकर यांची नावे निश्चित झाली होती. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.परंतु एका रात्रीत नाट्यमय घडामोडी घडून राजळे गटाच्या उषाताई अकोलकर आ.घुले-ढाकणे गटात दाखल झाल्या़ त्यामुळे आ.घुले-ढाकणे गटाचे संख्याबळ चार झाले. राजळे यांच्याकडेही चार सदस्य झाले. परंतु मतदानासाठी राजळे गटाच्या कलावती गवळी गैरहजर होत्या. त्यामुळे सातच सदस्य पंचायत समितीत उपस्थित होते. परंतु राजळे गटाच्या तीन सदस्यांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याने चारच सदस्यांचे मतदान झाले़ यामध्ये उषाताई अकोलकर यांची सभापतीपदी तर बेबीताई केळगंद्रे यांची उपसभापतीपदी निवड झाली. कलावती गवळी या गैरहजर नसून त्यांचे अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पाथर्डी पोलिसात दिली होती. त्यावरुन नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यात संभाजी पालवे, देविदास खेडकर व गवळी समर्थकांनी धरणे आंदोलन केले़ सायंकाळी पोलिसांनी सभापती उषाताई अकोलकर व विष्णुपंत अकोलकर यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. (तालुका प्रतिनिधी)
सोमवारी सकाळी कलावती गवळी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, उषाताई अकोलकर व विष्णुपंत अकोलकर हे माझ्या घरी आले व मतदानासाठी चला असे म्हणाले़ त्यानुसार मी त्यांच्याबरोबर गेले व त्यांनीच मला मतदानापासून वंचित ठेवले़ गवळी यांच्या जबाबामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, या निवडी वादात सापडल्या आहेत़ गवळी यांना नेण्यासाठी वापरलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही निवड प्रक्रिया रद्द करावी यासाठी काहींनी उच्च न्यायालयात अपील केल्याची माहिती हाती आली आहे़