शेवगाव ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात सभापतींचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:47+5:302021-05-11T04:20:47+5:30
शेवगाव : सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत तालुक्यातील स्थानिक नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पंचायत ...
शेवगाव : सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत तालुक्यातील स्थानिक नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांच्या उपस्थितीत शेवगाव ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात सोमवारी सकाळी ठिय्या देण्यात आला.
त्यानंतर तहसीलदार अर्चना पागिरे यांना निवेदन देत स्थानिक नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात यावी, तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक कमलेश गांधी, कमलेश लांडगे, बंडू रासने, मनसेचे तालुकाप्रमुख गणेश रांधवणे, भाकपचे संजय नांगरे यांच्यासह उदय शिंदे, कुलदीप फडके, किरण पुरनाळे, तुषार पुरनाळे, तुषार लांडे, कृष्णा सातपुते, दत्तात्रय फुंदे, संतोष जाधव, रोहन साबळे आदी उपस्थित होते.
शेवगावच्या नावाने येणाऱ्या २०० लसीच्या डोसपैकी १५० हून अधिक डोस अन्य जिल्हा व तालुक्यातून येणारे लोक घेऊन जात आहेत. तेही लोक आपलेच आहेत, मात्र राज्यात सर्वत्र लसीकरण सुरू आहे. तरीही ब्रेक द चेन दरम्यान जिल्हा बंदी असताना जिल्हा ओलांडून ते लोक येतात व शेवगाव तालुक्याच्या वाट्याला आलेले डोस घेऊन जातात. हा सारासर स्थानिक नागरिकांवर अन्याय असल्याच्या भावना उपस्थितांतून व्यक्त करण्यात आल्या.
सभापती क्षितिज घुले यांनी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णापैकी तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर औषधोपचार करताना रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे लागते. अशा उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे; मात्र त्या तुलनेत होणारा रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा अत्यंत कमी आहे. तत्काळ इंजेक्शनचा पुरवठा वाढवून तालुक्याला रोज किमान २०० इंजेक्शन मिळावे, अशी मागणी निवेदनात केली. पागिरे यांनी तुमच्या मागणीची दखल घेऊन वरिष्ठांना कळवू, असे आश्वासन दिले.
---
१० शेवगाव ठिय्या
शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी ठिय्या दिला.