मतदार नोंदणीसाठी दोन दिवस जिल्ह्यात विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 06:13 PM2019-02-28T18:13:40+5:302019-02-28T18:14:29+5:30

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी दि. २ व ३ मार्च रोजी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.

 Special campaign in district district for two days for voter registration | मतदार नोंदणीसाठी दोन दिवस जिल्ह्यात विशेष मोहीम

मतदार नोंदणीसाठी दोन दिवस जिल्ह्यात विशेष मोहीम

अहमदनगर : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी दि. २ व ३ मार्च रोजी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.
१ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने नुकतीच दि. २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. तथापि, या मोहिमेवेळीही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. ६, ७, ८ व ८अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.
सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, अशी विनंतीदेखील राजकीय पक्षांना करण्यात आली आहे.
मतदारांच्या सोयीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही निवडणूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title:  Special campaign in district district for two days for voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.