विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक श्रीरामपुरात, मटका अड्ड्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:54 IST2020-10-23T15:53:35+5:302020-10-23T15:54:19+5:30
नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पथकाने गुरुवारी रात्री उशिरा शहरात मटका अड्डयांवर कारवाई केली. अवैैध गुटख्याच्या साठ्यांवर छापा टाकण्यासाठीच हे पथक शहरात धडकल्याचे मानले जात आहे. श्रीरामपूर पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक श्रीरामपुरात, मटका अड्ड्यांवर कारवाई
श्रीरामपूर : नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पथकाने गुरुवारी रात्री उशिरा शहरात मटका अड्डयांवर कारवाई केली. अवैैध गुटख्याच्या साठ्यांवर छापा टाकण्यासाठीच हे पथक शहरात धडकल्याचे मानले जात आहे. श्रीरामपूर पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. जिल्ह्यात अशा प्रकारे थेट नाशिकहून येऊन पोलिसांनी कारवाई करण्याची ही पहिलीच घटना आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावर यांनी नाशिक परीक्षेत्रातील अवैैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एका पथकाची नियुक्ती केली आहे. पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र सोनवणे, नितीन सपकाळे, विश्वेश हजारे, दीपक ठाकूर, उमाकांत खापरे, नारायण लोहरे यांचा समावेश आहे.
या पथकाने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी मटका अड्ड्यांवर कारवाई केली. यात सहा आरोपी मिळून आले. त्यांच्याकडून ११ हजार ७८० व सात हजार ११० रुपये रोख मिळून आले. दीपक ठाकूर व विश्वेश हजारे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
महानिरीक्षक कार्यालयातील विशेष पथकाने पुन्हा गुटखा साठ्यावरील कारवाईच्या हेतूने शहरात गुरुवारी मोहीम राबविली. त्यांना गुटखा मिळून आला नसला तरी पुन्हा कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक पोलिसांसाठी ही मोठी चपराक मानली जाते.
गुन्ह्यातील काही संशयीत अजूनही मोकाट आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा हस्तगत होऊनही सर्रासपणे गुटख्याची दुप्पट दराने छुपी विक्री सुरू आहे. बेलापूर, एकलहरे, निमगाव, लोणी, निमगाव जाळी हे गुटखा तस्करीचे मोठे केंद्र उघड झाल्याने महानिरीक्षकांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.