स्पिनर, लायटिंग, कार्टुन, डायमंड राख्यांचा ट्रेंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:47 PM2018-08-26T12:47:18+5:302018-08-26T12:47:22+5:30
बहीण-भावांच्या नात्यांचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण रविवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त शनिवारी बाजारात राख्या खरेदीसाठी महिलावर्गांनी मोठी गर्दी केली होती.
अहमदनगर : बहीण-भावांच्या नात्यांचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण रविवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त शनिवारी बाजारात राख्या खरेदीसाठी महिलावर्गांनी मोठी गर्दी केली होती. यंदा बाजारात स्पिनर, कार्टुन, लायटिंगच्या आणि डायमंडची आकर्षक डिझायन असलेल्या राख्यांचा ट्रेंड दिसत आहे़
लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या बाहुबली, डोरोमोन, छोटा भीम, पोकोमॅन व कार, बंदूकीच्या आकारातील छोट्या राख्यांनीही चांगलाच भाव खाल्ला आहे़ शहरातील कापडबाजार, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट, टिळक रोड, बागडपट्टी, नवीपेठ, प्रोफेसर चौक, पाईपलाईन रोड आदी ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून राख्यांचे स्टॉल सजले आहेत़ व्यवसायिकांनी मुंबई, गुजरात, दिल्ली येथून या राख्यांची खरेदी केलेली आहे़ स्थानिक ठिकाणीही राख्या तयार करण्याचा व्यवसाय केला जातो़ या सर्व राख्यांमध्ये स्पिनर आणि लायटिंगच्या राख्या बच्चे कंपनींना सर्वाधिक आकर्षित करत आहेत़ ज्येष्ठ महिला डायमंड आणि पारंपरिक पद्धतीच्या राख्यांना पसंती देताना दिसत आहेत़ छोट्या आकाराच्या राख्यांना पाकिटात कुरिअरने सहज पाठविणे शक्य असल्याने अशा राख्याही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत़
भावासाठी बहिणी जशा राख्या खरेदी करतना दिसल्या तसे भाऊही बहिणींसाठी बाजारात गिफ्ट खरेदी करताना दिसले़ त्यामुळे शनिवारी शहरात राख्यांचे स्टॉल आणि गिफ्टचे दुकाने हाऊसफूल्ल होती़ राख्यांना जीटएसटीच्या कक्षेतून वगळ्यात आल्याने दर जास्त काही वाढलेले दिसत नाही़ ५ रूपयांपासून ते ४०० रूपयांपर्यंत बाजारात राख्या उपलब्ध आहेत़
ओवाळणीचे तबकही उपलब्ध
बाजारात आकर्षक राख्यांसोबत भावाला ओवाळण्यासाठी लागणारे सुबक तबकही विक्रीस उपलब्ध आहेत. या तबकात हळद-कुं कवाची लहान पाकिटे, अक्षता, गणपतीची मूर्ती आणि पेढा अशी सामग्री असलेले ताट महिलांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे़
सोने-चांदीच्या राख्यांचीही खरेदी
आर्थिक परिस्थितीनुसार काही महिला आपल्या भावासाठी खास सोने अथवा चांदीची राखी खरेदी करतात़ शहरातील विविध सराफ दुकानांमध्ये आकर्षक डिझाईनमध्ये अशा सोने व चांदीच्या राख्या खरेदीसाठी उपलब्ध आहेत़
राख्या खरेदीसाठी यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे़ नवनवीन आणि आकर्षक डिझाईन असलेल्या डायमंडच्या राख्यांना चांगली मागणी आहे़ लहान मुलींकडून कार्टुन, लायटिंग आणि स्पिनच्या राख्यांना मागणी आहे. -अमित बिल्ला, विक्रेते