अध्यात्म: धन दारा पुत्र जन....सर्व मिथ्या हें जाणून/अशोकानंद महाराज कर्डिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 09:47 PM2020-08-06T21:47:47+5:302020-08-06T21:49:15+5:30
तारुण्य ओसरल्यावर कुठल्या आल्या आहेत लैंगिक तृष्णेच्या चेष्टा ? जल आटल्यावर सरोवराचे अस्तित्व असते का ? जवळचा पैसा संपल्यावर परिवार कुठे असतो ? संसाराचे सत्य स्वरूप समजले, यथार्थ ब्रह्मज्ञान झाले तर संसाराचे अस्तित्व राहते का ? हा संपूर्ण श्लोकाचा सरळ अर्थ आहे.
भज गोविन्दम -१२
——————-
वयसि गते क: काम विकार:,शुष्के नीरे क: कासार:
क्षीणे वीत्ते: क: परिवार:, ज्ञाते तत्वे क: संसार:
तारुण्य ओसरल्यावर कुठल्या आल्या आहेत लैंगिक तृष्णेच्या चेष्टा ? जल आटल्यावर सरोवराचे अस्तित्व असते का ? जवळचा पैसा संपल्यावर परिवार कुठे असतो ? संसाराचे सत्य स्वरूप समजले, यथार्थ ब्रह्मज्ञान झाले तर संसाराचे अस्तित्व राहते का ? हा संपूर्ण श्लोकाचा सरळ अर्थ आहे.
—- ————————————-
मानवाची वाढ ही गर्भधारणेपासूनच होत असते. बाल्यावस्था, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ आणि वृद्धावस्था या टप्प्यापैकी दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षापर्यंतचा काळ हा संक्रमणाचा काळ समजला जातो. या संक्रमणाच्या काळाला किशोरवय म्हणतात. या कालखंडात अपरिपक्व मुलांची पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या व मानसिक दृष्ट्या प्रगल्भ तारुण्यात रुपांतर होते. याच वयात माणसाची लैंगिक वाढ होते. या विकासाच्या टप्प्याला पौगंडावस्था म्हणतात. प्रजनन शक्ती ही मानवी समाज वाढीसाठी मिळालेली फार मोठी ईश्वरी देणगी आहे. धर्माला अविरुध्द असणारा काम म्हणजे माझी विभूती आहे, असे श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे. पण हाच काम जेव्हा वासनेत परिवर्तीत होतो, तेव्हा तो मानवी जीवन विकृत करून टाकतो.
हाच काम विकार किती काळ शरीरात कार्यरत राहू शकतो ? याला पण मर्यादा आहेत. हा काम विकार फक्त शरीर सुदृढ व सशक्त आहे, तोपर्यंतच कार्यरत असतो. पौगंड अवस्था आहे, तोपर्यंतच पुढे प्रौढावस्था व वृद्धावस्था आली की इंद्रिये शिथिल आणि कार्यक्षमरहित होऊ लागतात. पंचज्ञानेन्द्रिये व पंचकमेंद्रिये सर्व शिथिल होऊ लागतात. मनामध्ये वासना असते. पण शारीरिक बल संपल्यामुळे इंद्रियात शक्ती नसते. त्यामुळे तो भोग देखील भोगू शकत नाही. वैराग्यशतकामध्ये म्हटलेले आहे,
भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता:, तपो न तप्तं वयमेव तप्ता: ।
कालो न यातो वयमेव याता:, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा: ॥
आम्ही भोग नाही भोगले, भोगानेच आम्हाला भोगले. आम्ही तप नाही केले तर आम्ही तापलो. आम्ही काळ व्यतीत नाही केला तर काळानेच आम्हाला मागे सारले आहे. तृष्णा जीर्ण झाली नाही आम्ही जीर्ण झालो. आता भोग जरी समोर असला तरी आम्ही तो भोगू शकत नाही. कारण आचार्य म्हणतात, वयसि गते क: काम विकार:, आता कामवासना असली तरी तिचा उपयोग नाही. कारण वय सरले याकरिता आचार्य दृष्टांत देतात. शुष्के नीरे क: कासार: . सरोवरातील पाणी आटले तर त्याला सरोवर कोणी म्हणत नाही. माउली सुद्धा म्हणतात की सरोवर आटल्यावर त्यामध्ये प्रतिबिंब पडू शकत नाही. तोच प्रकार येथे आहे.
आचार्य पुढे आणखी सांगतात, क्षीणे वीत्ते: क: परिवार. जोपर्यंत माणसाजवळ पैसा, धन, द्रव्य आहे. तोपर्यंतच घरातील सर्व नातेवाईक आप्तेष्ट ख्याली खुशाली विचारतात. नंतर कोणीही विचारीत नाही. जोवरी बरवा चाले धंदा, तोवरी बहिण म्हणे दादा. जोपर्यंत धन द्रव्य असते, तोपर्यंतच हे सर्व विचारतात. पैसा संपला परिवार संपतो. उदाहरणच द्यायचे झाले तर भागवतातील अकराव्या स्कधातील कदर्युचे आख्यान सांगता येईल.
वेदांताचे तीन सिद्धान आहेत. १) ब्रह्म सत्य आहे. २) जग मिथ्या आहे. ३) जीव ब्रह्मरुप आहे. ब्रह्माचे सत्यत्त्व व जगताचे मिथ्यत्व व जीव हा ब्रह्माचा अंश आहे. म्हणून तो ब्रह्मरुप आहे, असे कळले की संसाराचे अस्तित्त्वच संपते. सर्व जग सत्य नसून ईश्वरच आहे. या सृष्टीतील पदार्थाचा मर्यादित भोग घे, याचा संग्रह करू नकोस. हे धन कोणाचे आहे ? श्री. नामदेव महाराज म्हणतात, धन दारा पुत्र जन । बंधू सोयरे पिशून । सर्व मिथ्या हें जाणून । शरण रिघा देवासी ॥ २ ॥ जन्म आणि मरण हा एकप्रकारचा संसारच आहे व तो कल्पित आहे. हे कळले की मग संसार राहतोच कुठे ? ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. त्यासाठी या अगोदरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आचरण करावे लागेल हे मात्र खरे.
-भागवताचार्य श्री. अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागवताताश्रम, चिचोंडी (पाटील) ता. नगर
मो. ९४२२२२०६०३