अध्यात्म/कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत /अशोकानंद महाराज कर्डिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 06:09 PM2020-09-03T18:09:06+5:302020-09-03T18:09:40+5:30
प्रपंचातील पती,पत्नी कोण कोणाचे आहे ? तू व्यर्थ धनाची चिंता का करतोस? या संसाराची चिंता करून काहीच उपयोग नाही. सतत जीव या चिंतेच्या फेºयात अडकून राहतो ? आम्ही संतांनी दाखवलेल्या मार्गानुसार का चालत नसू बरे ? या संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर गेलो तरच आपण या मोहाच्या व संसाराच्या चिंतेतून मुक्त होऊ.
भज गोविन्दम -१५
का ते कान्ता धनगतचिन्ता वातुल किं तव नास्ति नियन्ता।
त्रिजगति सज्जन संगतिरेका भवति भवार्णवतरणे नौका ॥१५॥
---------------
प्रपंचातील पती,पत्नी कोण कोणाचे आहे ? तू व्यर्थ धनाची चिंता का करतोस? या संसाराची चिंता करून काहीच उपयोग नाही. सतत जीव या चिंतेच्या फेºयात अडकून राहतो ? आम्ही संतांनी दाखवलेल्या मार्गानुसार का चालत नसू बरे ? या संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर गेलो तरच आपण या मोहाच्या व संसाराच्या चिंतेतून मुक्त होऊ.
संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू व या दोन्हीच्या मध्ये असतो तो म्हणजे प्रपंच. तो जसा गृहस्थाचा असतो तसा तो संन्याशाचा सुद्धा असतो. गृहस्थ म्हटले की त्याला पत्नी, मुले-बाळे, आई , वडील सर्व नाते-गोते येतातच. व या सर्वांचा सहवास फार सुखाचा असतो असे नाही. पण! यातच जीवाला सुख वाटत असते. श्री. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक पती आपल्या पत्नीच्या एवढा अधीन होतो की सर्व सुख तिच्याच सहवासात आहे, असे मानतो. चित्त आराधी स्त्रियेचे, तीयेचेनी छंदे नाचे, माकड जैसे गारूड्याचे तैशा परी होय. त्याची अवस्था एखाद्या माकडासारखी होते.
राजा भर्तुहरीसारखी अवस्था वाईट होते. त्याने एका साधूला मुल व्हावे म्हणून विनंती केली होती. तेव्हा त्या साधूने दिलेले फळ पत्नीला दिले पण तिचे प्रेम प्रधानावर होते. तिने त्याला दिले व त्या प्रधानाचे प्रेम एका वेश्येवर होते. त्याने वेश्येला दिले. तिला राजाविषयी आदर होता. तिने भर्तुहरीला तेच फळ दिले. यावरून राजाला सर्व कळाले आणि त्यांने सर्वसंगपरित्याग केला. ‘भर्तृहरी शतक’ या अनुभावावरुनच त्याने लिहिले आहे. तात्पर्य कोणीच कोणाचे नसते. भरवसा धरू नये.
‘दुज्यावर प्रीती मोठी आपल्याचसाठी’ असे एक संतवाचन आहे. याचा अर्थ आपण जे दुसºयावर प्रेम करतो, ते त्याच्यासाठी नसून आपल्यासाठीच असते. बृहदारण्यक उपनिशषदामध्ये याज्ञवालक्य ऋषींनी त्यांची पत्नी मैत्रेयीस उपदेश केला होता. त्यात ते म्हणतात, न वा अरे, सर्वस्य कामाय सर्वेप्रियं भवति, आत्मनस्तुवै, कामाय सर्वेप्रियं भवति। ... आत्मन: खलु दर्शनन इदं सर्वं विदितं भवति। हे मैत्रेयी कोणीही दुसºयासाठी प्रेम करीत नाही. स्वत: करीतच सर्व प्रिय असतात. पती पत्नीवर प्रेम करतो मुलाबाळावर प्रेम करतो, असे फक्त भासत असते. वास्तविक जो तो स्वत:वरच प्रेम करीत असतो. आपला जीव जर जायला लागला तर मनुष्य दुसºयाचा जीव घेतो. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु । नाहीं तरि संसारु वायां जाईल रया ॥१॥कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत । मृगजळवत जाईल रया ॥२॥विषयाचें सम सुख बेगडाची बाहुली । आभ्राची सावुली वायां जाईल रया ॥३॥ज्ञानदेव म्हणे पाहातां पाहलें । स्वप्नींचे चेईलें जायील रया ॥४॥ किंवा
क्षणभंगुर नाही भरवसा, व्हारे सावध तोडा माया, आशा काही न चले, मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वोळसा गा (तु. म.) जीवन क्षणभंगुर आहे, याचा भरवसा धरता येत नाही. म्हणून सावध होऊन सद्सदविचार केला पाहिजे व संतांनी दाखवलेल्या मार्गाने गेले पाहिजे. श्री. संत निळोबाराय म्हणतात, मार्ग दावोनी गेले आधी, दयानिधी संत ते. किंवा ज्ञानेश्वरीत संगितले आहे. गुरु दाविलिया वाटा, येवोनिया विवेक तीर्थ तटा, धुवोनिया मळकटा, बुद्धीचा तेणे. म्हणूनच संतसंगती अत्यंत महत्वाची आहे. किंबहुना भावासारातून या संतसंगतीरुपी नोकेतून सहज पार जाता येईल. जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा.
-भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भगवताश्रम , चिचोंडी (पाटील) ता. अहमदनगर (मोब. ९४२२२२०६०३ )