अध्यात्म- विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला- अशोकानंद महाराज कर्डिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 12:32 PM2020-11-05T12:32:38+5:302020-11-05T12:34:53+5:30
ज्याचे मन परब्रह्मामध्ये स्थित आहे म्हणजे थोडक्यात जो स्थितप्रज्ञ आहे, ज्याच्या दृष्टीमध्ये जगत न दिसता जगदीश्वर दिसतो. स्वभिन्न कोणीच वाटत नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने हिला, विठ्ठलची विठ्ठलची (तु.म.)
भज गोविन्दम -१९
योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन:।
यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव ॥१९ ॥
ज्याचे मन परब्रह्मामध्ये स्थित आहे म्हणजे थोडक्यात जो स्थितप्रज्ञ आहे, ज्याच्या दृष्टीमध्ये जगत न दिसता जगदीश्वर दिसतो. स्वभिन्न कोणीच वाटत नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने हिला, विठ्ठलची विठ्ठलची (तु.म.)
वेदांतामध्ये एक प्रसिध्द वाद आहे, त्याचे नाव दृष्टी-सृष्टी वाद व सृष्टी- वाद. जशी दृष्टी असेल तसी सृष्टी दिसते. व एक वाद असा की जसी सृष्टी तसी दृष्टी. दृष्टीत जर देव असेल तर संपूर्ण सृष्टी देवस्वरूप दिसते. तसे ज्याचे अंतकरण भगवदमय झाले त्याला विश्व हे देव वाटते. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात, ऐसा ज्याचा अनुभव, विश्व देव सत्यत्वे, देव तयाजवळी वसे, पाप नासे दरुशने, विश्व सत्य नाही तर ते भगवद्रूप आहे. ही प्रतिभा अनुभूती ज्याला आली, असा महात्मा योगसाधनेत रममाण होवो किंवा वेगवेगळ्या भौतिक विषयात रममाण होतो. त्याचे काहीही नुकसान होत नाही. मग तू राहे भलते ठायी, जनी वाणी खाटे भुई (तु. म.) महात्मा व्यवहारात आणि परमार्थात कोठेही असो त्याची स्थिती भंग पावत नाही हे विशेष. हिंदू श्रुती स्मृती ग्रंथामध्ये अशा या ब्राह्मी स्थितीचे अलोकिक वर्णन केलेले आहे. एषा ब्राह्मी स्थिति: पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति। स्थित्वाऽस्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति।।२-७२।। अजुर्ना ! हि ब्राह्मी स्थिती आहे. माउली म्हणतात, हे ब्राह्मी स्थिती नी:सीम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रहम अनायासे २/७२/३६८ या स्थितीला जो प्राप्त झालेला आहे, तो सहज निष्काम असतो. असा महात्मा जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामाप्रमाणे या अनुभूतीमध्ये रममाण झालेला असतो. अशा महत्म्याला वेद सुद्धा मर्यादा घालू शकत नाही. याचा अर्थ वेद काही त्याला स्वैराचाराचा परवाना देतो असे नाही. अनेक ग्रंथात सांगितले आहे की हा महात्मा विधी निषेधाच्या पलीकडे गेलेला असतो. माउली अनूभावामृत या ग्रंथात सांगतात, ‘स्वैर झाला समाधी, स्वेछाची झाला विधी’ वेदाने सिध्द पुरुषाला दिलेला हा एक स्वतंत्र अधिकार आहे.
डॉक्टर एखाद्या पेशंटच ऑपरेशन करीत असतांना तो पेशंट दगावला तर डॉक्टरवर काही खुनाचा गुन्हा दाखल करीत नाहीत. कारण त्या डॉक्टरचा उद्देश स्वच्छ असतो. किंवा सर्वोच्च न्यायालात ज्याला फाशीची शिक्षा झालेली आहे, अशा आरोपीला सुद्धा राष्ट्रपती ती शिक्षा कमी करू शकतात. हा त्यांचा एक विशेषाधिकार आहे. तसे या महात्म्याचे आहे. त्याला देह तादात्म्य नसते. त्यामुळे कदाचित त्याच्याकडून प्रारब्धवशात चुकून जरी काही निशिद्ध कर्म जरी घडले तरी त्याला दोष लागत नाही. भगवदगीतेमध्ये अध्याय २-३८ मध्ये सांगितले आहे की सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥३८॥ सुखी संतोषा न यावे, दु:खी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे, मनामाजी. याप्रमाणे जर अर्जुना तुझी वृत्ती झाली तर तुला युध्द करूनही पाप लागणार नाही. हा खरा गीतेचा संदेश आहे पण ! लोक सोयीस्कर दुर्लक्ष करतात.
संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तयाचेनि हातू घडे त्रैलोक्याचा घातू परी तेणे केला हे मातू बोलू नये, कारण त्याचा देह तादात्म्य संपलेले असते. व तो देहाला धरून होणाऱ्या आचरणाच्या अधीन नसतो किंबहुन त्याला त्याचे भानही नसते. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नवरी, आता चारी दिवस खेळीमेळी. ही त्याची अलोकिक स्थिती असते. त्याचे हे कार्य जगाच्या उद्धाकाराकरीताच असते. तो महात्मा आत्मनंदांतच रममाण असतो. म्हणूनच श्री नित्यानंदाचर्य सांगतात तोच महत्मा केवळ आत्मनंद भोगतो. तोच आनंद मिळवतो किंबहुना तो आनंदस्वरूपच असतो यात शंका नाही.
-भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी(पाटील) संपर्क ९४२२२२०६०३