मढीच्या बाजारात गाढवांनी खाल्ला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 04:59 PM2019-03-27T16:59:39+5:302019-03-27T16:59:53+5:30
दुुष्काळामुळे पाणी टंचाईचा फटका व वाहतुकीच्या साधनांचा न परवडणारा खर्च, दूरची पायपीट यामुळे मढी (ता.पाथर्डी) येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या बाजारात यावर्षी गाढवांची आवक घटली. मात्र तुलनेत ग्राहक वाढल्याने गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा त्यांनी चांगलाच भाव खाल्ला.
चंद्रकांत गायकवाड
तिसगाव : दुुष्काळामुळे पाणी टंचाईचा फटका व वाहतुकीच्या साधनांचा न परवडणारा खर्च, दूरची पायपीट यामुळे मढी (ता.पाथर्डी) येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या बाजारात यावर्षी गाढवांची आवक घटली. मात्र तुलनेत ग्राहक वाढल्याने गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा त्यांनी चांगलाच भाव खाल्ला.
मढीत पोहोचण्यापूर्वीच तिसगावचे शमा शेख यांच्या शेतवस्तीवर मुक्कामी असलेली ट्रकभर गाढवे एकाच ग्राहकाने खरेदी केली. या गाढवांना प्रत्येकी ६ ते १२ हजार रूपयांचा दर मिळाला. आमराईतील बाजारात राजस्थान येथून मुराद शहा यांनी आणलेल्या ४० गाढवांना प्रत्येकी १० ते १२ हजार रूपयांपर्यंत किंमत मिळाली. मुखेड (जि़ नांदेड) येथील श्रीरंग मामिलवार यांनीही काठेवाडी प्रकारातील १०० गाढवे विक्रीला आणली होती. शरीरकाठी, वय, प्रतवारी, रंग पाहून बाजारात त्यांचा दर ठरतो. गेल्यावर्षी काठेवाडी गाढवांना ९ ते १९ हजार रूपये किंमत होती. यंदा यात वाढ होऊन या गाढवांचा दर १२ ते २५ हजार रूपये असा वधारला आहे. यांत्रिकीकरण झाले तरी गाढवांशिवाय काही वाहतुकीची कामे होतच नाहीत, असे ते म्हणाले. पाणी टंचाईने वीटभट्ट्या बंद असल्या तरी जनावरांची खरेदी करावीच लागते, असे बेलापूरचे भाऊसाहेब नवनिघे यांनी सांगितले.
गाढवांच्या खरेदी विक्रीची माहिती व उलाढालीमुळे पाच वर्षांपासून रंगपंचमी बाजारात राजस्थानी गाढवे आणतो. यावर्षी दरात तेजी आहे. गेल्यावर्षी साडेसात हजार ते अकरा हजार रूपये असलेला दर यंदा १० ते १५ हजार रूपयांपर्यंत पोहोचला आहे. हा बाजार या भूमीचे वैभव आहे. माणसांसह जनावरांना किमान पिण्याचे पाणी उपलब्ध करणे गरजेचे आहे. - मुरादभाई शहा, व्यापारी
शके १०१० मध्ये रंगपंचमीच्या मुहूर्तावर चैतन्य कानिफनाथ महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतल्याची आख्यायिका आहे. त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी छत्रपती शाहू महाराजांनी सरदार चिमाजी सावंत यांच्याकरवी कानिफनाथ गडाचे बांधकाम अठरापगड जातीधर्माच्या लोकांनी पूर्ण केले. त्यानुसार विविध समाजाचे मानपान सुरू आहेत. गाढवांचा बाजार आरंभही त्याच कालखंडात आहे. गाढवे हेच त्यावेळी एकमेव वाहतुकीचे साधन होते. रंगपंचमीस १००९ वर्षांची, तर गाढवांच्या बाजारास ७५० वर्षांची परंपरा आहे. मधुकर साळवे, विश्वस्त, श्रीक्षेत्र मढी देवस्थान.