रेमडेसीवीरचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:08+5:302021-04-10T04:21:08+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले ...
अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान, जेवढ्या रिकाम्या बाटल्या जमा होतील, तेवढेच इंजेक्शन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजेंंद्र भोसले यांनी शुक्रवारी केल्या.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी भोसले यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे माहिती दिली. ते म्हणाले, रेमडेसीवीरबाबत काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे संबंधितांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. महापालिकेला खासगी रुग्णालयांत उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसीवीरचा होत असलेला वापर, याबाबतची माहिती घेण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात असल्याचे भोसले यांनी सांगितले. मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याशी संपर्क साधला असता गोरे म्हणाले, रेमडेसीवीरचा अनावश्यक वापर होतो का, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन रुग्णालयांसाठी एक कर्मचारी, याप्रमाणे १५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्मचारी खासगी कोविड केअर सेंटरमधील उपलब्ध बेड, ऑक्सिजन व्हेंटीलेटर आदी माहिती घेऊन महापालिकेला अहवाल सादर करतील.
....
मास्क वापरा, गर्दी करू नका
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, गर्दी करू नये तसेच आवश्यक असेल तर घराबाहेर पडावे. नियमांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.