श्रीगोंदा शहरात दुपारपर्यंत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 08:04 PM2018-06-09T20:04:46+5:302018-06-09T20:04:50+5:30
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
शनिवारी सकाळी दहा वाजता भुजबळ समर्थकांनी शनिचौकात एकत्र जमून निषेध सभा घेतली. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ८ जून रोजी पहाटे तपासादरम्यान कोसेगव्हाणचे माजी उपसरपंच भीमराव नलगे यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळे महावीर जाधव यांना निलंबित करण्याची मागणी नानासाहेब कोंथिबीरे, एम़ डी़ शिंदे, गोरख आळेकर, सुमीत बोरुडे, पोपट खेतमाळीस यांनी केली.
पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोवार म्हणाले, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने महावीर जाधव यांना पंधरा दिवस सक्तीच्या रजेवर पाठवले असून, या प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. पोवार यांच्या आश्वासनानंतर बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले आणि शहराची बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली.
वादाची ठिणगी पडली व विझली
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांना पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पंधरा दिवस सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यामुळे शहर बंद करणे बरोबर नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रा. तुकाराम दरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती़ त्यावर भुजबळ समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाहेरच्या माणसांनी आमच्यात ढवळाढवळ करू नये, अशा पोस्टही फिरू लागल्या. त्यावर प्रा. दरेकर हे चांगलेच संतप्त झाले़ बाहेर गावातून शहरात स्थानिक झालेल्या नागरिकांचे ५० टक्के मतदान आहे. त्यामुळे आम्ही जनहिताचे मत मांडले. यामध्ये काय गैर, असा सवाल त्यांनी केला़ त्यानंतर या वादावर पडदा पडला.