मालवाहतुकीमुळे एसटी मालामाल; चालक मात्र कंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:17+5:302021-06-01T04:16:17+5:30
अहमदनगर : कोरोनाकाळात एसटी महामंडळाला मालवाहतुकीने तारले. मालवाहतुकीसाठी एसटीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, भाडे घेऊन गेल्यानंतर परतीचे भाडे ...
अहमदनगर : कोरोनाकाळात एसटी महामंडळाला मालवाहतुकीने तारले. मालवाहतुकीसाठी एसटीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, भाडे घेऊन गेल्यानंतर परतीचे भाडे मिळेपर्यंत चालकाला त्याच ठिकाणी थांबावे लागते. त्यामुळे चालकाच्या खिशाला झळ बसत आहे. परिमाणी मालवाहतुकीत एसटी मालामाल; चालक मात्र कंगाल अशी स्थिती होत आहे.
कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद असल्याने महामंडळाला मोठा फटका बसला. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत म्हणून एसटीने मालवाहतूकही सुरू केली. नगर जिल्ह्यात २१ मे २०२० रोजी मालवाहतूक सुरू झाली. जिल्ह्यात एकूण ११ आगार असून, त्यात मालवाहतुकीसाठी ८८ बसेस आहेत. त्या सर्व सध्या सुरू आहेत. गेल्या वर्षभरात यातून नगर विभागीय कार्यालयाला पावणेतीन कोटींचे उत्पन्न मिळाले.
---------
जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक - ८८
वाहतूक सुरू असलेले ट्रक - ८८
----------
पावणेतीन कोटींची कमाई
जिल्ह्यात ११ आगारांत मिळून ८८ मालवाहतूक बस आहेत. २१ मे २०२० रोजी मालवाहतूक सेवा सुरू झाली. या वर्षभराच्या कोरोना काळात जिल्ह्यात एसटीने मालवाहतुकीतून पावणेतीन कोटींची कमाई केली.
---------
चालकाचा होतो वैयक्तिक खर्च
माल घेऊन गेल्यानंतर परतीची मालवाहतूक ऑर्डर मिळेपर्यंत चालकाला त्याच ठिकाणी राहावे लागते. यामुळे त्याचा वैयक्तिक खर्च होतो. त्याला मिळालेला भत्ता तूटपुंजा असल्याने त्याला खिशातून पैसे टाकावे लागतात.
--------
ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट
मालवाहतूक दौऱ्यासाठी ॲडव्हान्स दिला जातो. पण पगारातून ही रक्कम कपात केली जाते. त्यामुळे चालकांना मोठा फटका बसत आहे. जेवढे दिवस मुक्काम होईल, तेवढा भत्ता चालकांना देणे गरजेचे आहे.
----------
चालक म्हणतात...
एसटी मालवाहतुकीतून मंडळाला चांगले उत्पन्न मिळत आहे. आम्हाला भाडे घेऊन जाताना ॲडव्हान्स रक्कम दिली जाते. मात्र, नंतर ती पगारातून कपात होते.
- एक चालक
-------
अनेक चालकांना मालवाहतुकीचे भाडे घेऊन गेल्यानंतर आठ - आठ दिवस परतीचे भाडे मिळत नाही. त्यामुळे तिकडेच राहावे लागते. या काळात त्याला राहण्यासाठी, भोजन, नाष्टा असा खर्च स्वत:च करावा लागतो. त्यामुळे आर्थिक झळ बसते. महामंडळाने अशा चालकांना आवश्यक भत्ता देण्याची गरज आहे.
- डी. जी. अकोलकर, सचिव, एसटी कामगार संघटना