एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:23+5:302021-09-23T04:23:23+5:30
संगमनेर : कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत परराज्यात जाणाऱ्या बसेस ...
संगमनेर : कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत परराज्यात जाणाऱ्या बसेस पूर्णपणे बंद होत्या. दुसऱ्या लाटेचे निर्बंध शिथिल केल्यानंतर परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागातून परराज्यात जाणाऱ्या बसेस पुन्हा सुरू करण्यात आल्या असून, प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो आहे.
महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाची बस म्हणजेच एसटी सर्वसामान्यांना हक्काची वाटते. ‘गाव तेथे एसटी’, ‘रस्ता तेथे एसटी’ या ब्रीद वाक्याप्रमाणे अगदी खेड्यांपासून ते बड्या शहरांपर्यंत एसटीची सेवा पोहोचली आहे. परराज्यातसुद्धा परिवहन महामंडळाच्या बसेस जातात. अहमदनगर विभागात एकूण अकरा आगार आहेत. यापैकी पारनेर, तारकपूर (अहमदनगर), श्रीरामपूर आणि शिर्डी येथून परराज्यात बसेस जातात. पारनेर-सेलवास, तारकपूर-सूरत, श्रीरामपूर- सूरत (दोन बसेस), श्रीरामपूर-इंदूर या परराज्यात जाणाऱ्या बसेस सध्या सुरू आहेत. मात्र, राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने परराज्यात जाणाऱ्या काही बसेसही बंद आहेत. यात शिर्डी-हैद्राबाद, तारकपूर-गाणगापूर, शिर्डी-सेलवास या बसेसचा समावेश आहे. मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली असता, या बसेस पुन्हा सुरू करण्यात येतील. असे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले.
-----------------
परराज्यात जाणाऱ्या सुरू बसेस
पारनेर-सेलवास
तारकपूर-सूरत
श्रीरामपूर-सूरत (दोन बसेस)
श्रीरामपूर-इंदूर
-----------------
परराज्यात जाणाऱ्या बंद बसेस
शिर्डी-हैद्राबाद,
तारकपूर-गाणगापूर
शिर्डी-सेलवास
--------------------
श्रीरामपूर आगारातील साधारण ८० ते ८५ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. श्रीरामपूर-सुरत आणि श्रीरामपूर-इंदूर या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगली आहे.
- राकेश शिवदे, आगारप्रमुख, श्रीरामपूर आगार
...................
star 1212