गोरेगाव-कान्हूर पठार रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ
By | Published: December 6, 2020 04:21 AM2020-12-06T04:21:01+5:302020-12-06T04:21:01+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील गोरेगाव-किन्ही-कान्हूर पठार रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘खड्डेच खड्डे.. जिल्हामार्ग की कच्चा रस्ता’ अशा आशयाचे गुरुवारी (३ डिसेंबर) ...
सुपा : पारनेर तालुक्यातील गोरेगाव-किन्ही-कान्हूर पठार रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘खड्डेच खड्डे.. जिल्हामार्ग की कच्चा रस्ता’ अशा आशयाचे गुरुवारी (३ डिसेंबर) ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तत्काळ दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवारी (दि.५) खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.
गोरेगाववरून किन्ही, कान्हूर, तिखोल, बहिरोबावाडी, टाकळी ढोकेश्वर, कोरठणचा खंडोबा, आळेफाटा, बेल्हा, कल्याण, मुंबई, संगमनेर, नाशिक या भागाकडे जाताना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. अवजड वाहनांची वर्दळ, यावर्षी झालेला पाऊस, वरचेवर देखभाल करण्याकडे झालेले दुर्लक्ष, यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने प्रवासी व वाहनचालक यांना होणारा त्रास भविष्यात घडणाऱ्या दुर्घटना याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून संबंधीत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.
याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्रीरंग देवकुळे यांनी रस्त्याच्या कामास मंजुरी असली तरी शासनाच्या मंजुरीनंतर निविदा निघतील, असे सांगितले होते. त्यास अवधी लागणार आहे. त्यामुळे सध्या लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून त्याच्या दुरुस्तीचे आदेश देताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे काम सुरू झाल्याने गोरेगावकर, किन्ही, बहिरोबाचीवाडी, तिखोल, हिवरे कोरडा या गावातील लोकांची खराब रस्त्यामुळे होणारी कुचंबना थांबली.
खड्डे बुजविण्यास सुरूवात झाली असली तरी लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी गोरेगावचे माजी उपसरपंच अभयसिंह नांगरे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी नरसाळे, युवक कार्यकर्त्यांनी केली आहे.
फोटो दोन आहेत
०५ किन्ही रोड, १
पारनेर तालुक्यातील गोरेगाव किन्ही मार्गे कान्हूर पठार रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास झालेली सुरुवात.