निळवंडेची राजकीय कालवा-कालव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:17 PM2019-01-12T12:17:04+5:302019-01-12T12:18:03+5:30
निळवंडे कालव्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय चढाओढ लागली आहे.
रियाज सय्यद
शिर्डी : निळवंडे कालव्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय चढाओढ लागली आहे. मात्र कालव्यात पाणी आले तरच दुष्काळी १८२ गावे सुजलाम सुफलाम होतील, हेही तितकेच खरे. त्यासाठी राजकारण नव्हे हितकारण होणे अपेक्षित आहे.
निळवंडे धरण अकोले तालुक्यात आहे. या धरणाचा डावा कालवा अकोलेसह संगमनेर व राहाता तालुक्यातून प्रस्तावित आहे. अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी बंदिस्त कालव्याची मागणी लावून धरली आहे. तर खा. लोखंडे व आ. विखे हे या कालव्यांच्या कामात येणाऱ्या अडचणींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर असताना ‘लोखंडे-विखे’ हे दोन्ही नेते निळवंडे कालव्याची राजकीय कालवा-कालव करू लागले आहेत. २ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी पारंपरिक पध्दतीने भूमी अधिग्रहण झाल्याचे तांत्रिक कारण देत गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने अकोले तालुक्यात बंदिस्त कालवे होऊ शकत नाहीत, असे स्पष्ट केलेले असताना पिचड मात्र आपली भूमिका सोडायला तयार नाहीत. कालव्यांची कामे बंद पाडली म्हणून दुष्काळी गावातील संतप्त शेतकºयांनी पिचड यांच्या पुतळे दहनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यास अकोलेकरांचा विरोध आहे. पण, गेली ३०-४० वर्षे निळवंडे धरण व कालवे यावर आपली पोळी भाजणाºया राजकारण्यांना निवडणुकांच्या ऐन तोंडावरच हे शहाणपण का बरे सूचले असावे? राजकारण्यांचे चल पुढच्या... तर नसावे? या प्रश्नाची उत्तरे दुष्काळग्रस्त शेतकºयांना आता मिळाले आहे. निळवंडे धरणातून शिर्डी व कोपरगावला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नेण्यास पाटपाणी कृती समितीचा तीव्र विरोध आहे. त्यावर मात्र कुणीही बोलण्यास तयार नाही.