अण्णांचे मन वळविण्यात राज्य सरकारला अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:34 PM2018-03-20T18:34:02+5:302018-03-20T18:59:59+5:30
अण्णा हजारे - महाजन भेट : आंदोलनाचा निर्णय पक्का; अण्णा दिल्लीकडे रवाना
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २३ मार्चपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार असून बुधवारी सकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. परंतु अण्णा आपल्या निर्णयावर ठाम असून उद्या नियोजित आंदोलनासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.
त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौ-यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या पत्रांना उत्तरे देण्यासाठी वेळ मिळाला नसल्याची टीका यावेळी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. आपण लोकांसाठी आंदोलन करीत आहे. हार्ट अॅटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणं चांगलं म्हणून उपोषण करणारच असा निर्धार अण्णा हजारे यांनी केलाय. शेतक-यांच्या शेतमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा, कृषिमूल्य आयोगाला स्वतंत्र दर्जा द्यावा, शेतीवर अवलंबून असणा-या शेतक-यांना किमान दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळावी, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतक-यांचा पीक विमा सामूहिक न करता तो वैयक्तिक करावा, १९४९ बँक रेग्युलेशन अॅक्टनुसार पीक कर्जाला चक्रवाढ व्याज लावू नये, शेतमजुरांना उत्पादन सुरक्षा रोजगाराची हमी द्यावी, लोकपाल व लोकायुक्त यांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, निवडणूक सुधारणेत उमेदवाराच्या नावापुढे फोटो व चिन्ह काढून फोटोलाच चिन्हाची मान्यता द्यावी, राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे, असे अण्णा हजारे यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, सरकारच्या वतीने मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी पुन्हा एकदा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत भेट घेतली. अण्णा आणि महाजन यांची चर्चा दोन तास चालली, परंतु त्यांना पुन्हा एकदा अण्णांचे मन वळविण्यात अपयश आले. यावेळी महाजन म्हणाले की, सरकार चर्चेसाठी तयार आहे, मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत संपर्क चालू आहे. अण्णांच्या सर्व मागण्या या देशहिताच्या असून त्याचा देशातील सर्व जनतेला फायदाच होणार आहे. भेटीनंतर अण्णांच्या प्रमुख मागण्यांचे पत्र घेऊन मुंबईकडे महाजन रवाना झाले.