अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
By सुधीर लंके | Published: October 5, 2024 08:52 AM2024-10-05T08:52:56+5:302024-10-05T08:55:59+5:30
अहमदनगर शहराचे नाव बदलून ते अहिल्यानगर असे करण्याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे
अहमदनगर: अहमदनगर शहराचे नाव बदलून ते अहिल्यानगर असे करण्याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. जिल्ह्याचे नाव अहमदनगर असेच राहणार आहे.
शासनाचे उपसचिव दि. ब. मोरे यांच्या नावाने ४ ऑक्टोबर रोजी हे राजपत्र प्रकाशित झाले आहे. अहमदनगर शहराच्या नामकरणास गृह मंत्रालयाने १ ऑक्टोबर रोजी अनुमती दिली. त्यानुसार या अधिसूचनेद्वारे अहमदनगर शहराचे नाव बदलून ते 'अहिल्यानगर, तालुका व जिल्हा अहमदनगर', असे करण्यात येत आहे, असे या राजपत्रात म्हटले आहे.
असाधारण क्रमांक ११२ या क्रमांकाने हे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. या राजपत्रानुसार अहमदनगर शहराचे नाव आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाईल. मात्र जिल्ह्याचे नाव हे अहमदनगर असेच राहणार आहे.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नामकरण करण्याची घोषणा केली होती त्यानुसार शासनाने हे राजपत्र प्रसिद्ध केले आहे.