राज्य सरकार सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार-दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 03:57 PM2020-05-15T15:57:33+5:302020-05-15T15:58:36+5:30
शासन बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना आणणार आहे. या योजनेद्वारे शेतक-यांना सक्षम बनविणार आहोत. गटशेती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
राहुरी : नैसर्गिकपणे उपलब्ध असणा-या कृषि मालाचे ब्रँडींग करुन शहरातील ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्यास शेतकरी बाधवांचा आर्थिक स्तर उंचविण्यात मदत होईल. शासन बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना आणणार आहे. या योजनेद्वारे शेतक-यांना सक्षम बनविणार आहोत. गटशेती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार आहोत, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतिक बँक अर्थसहाय्यीत, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्राद्वारे सेंद्रिय शेती निविष्ठा वापर, उत्पादन, प्रमाणीकरण आणि विपणन व्यवस्था या विषयावरील आॅनलाईन प्रशिक्षणाच्या समारोप शुक्रवारी झाला. याप्रसंगी राज्यातील शेतक-यांशी संवाद साधताना कृषिमंत्री दादा भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा उपस्थित होते. यावेळी डॉ.अशोक फरांदे, डॉ. शरद गडाख, डॉ. किरण कोकाटे, डॉ. दिलीप पवार, विजय कोते, डॉ. सुनील गोरंटीवार,डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.
शेतकरी उत्पादन घेतो. पण ते विकणे अवघड जाते. या लॉकडाऊन स्थितीमध्ये काही शेतक-यांना स्वत: शेतीउत्पादन विक्रीचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले. याच उत्पादनाला बॅ्रन्डींगची जोड दिली तर नक्कीच शेतीमालाला जास्त दर मिळतील. सेंद्रिय शेती मालाचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सेंद्रिय शेतीचे धोरण ठरवताना शेतक-यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असेही भुसे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. याप्रसंगी कृषिरत्न विश्वासराव पाटील, अनिल देशमुख, प्रशांत नाईकवाडी, वैभव चव्हाण, रेवती जाधव, मोनिका मोहिते, विवेक माने, उत्तम धिवरे यांनी मनोगत व्यक्त केले.