राज्य सरकारचा विखे-पाटील पुरस्कार क्रांती मोरे यांना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:52+5:302021-04-04T04:20:52+5:30
अहमदनगर : राज्यातील कृषी प्रयोगशीलतेला चालना मिळावी यासाठी कृषी, कृषिसंलग्न क्षेत्र, तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती ...
अहमदनगर : राज्यातील कृषी प्रयोगशीलतेला चालना मिळावी यासाठी कृषी, कृषिसंलग्न क्षेत्र, तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिल्या जाणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली असून, नगर येथील प्रादेशिक साखर संचालक क्रांती चौधरी-मोरे या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे कृषी सेवारत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. आजवर हा पुरस्कार केवळ पुरुष अधिकाऱ्यांनाच मिळाला. मात्र, हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मोरे या पहिल्याच महिला अधिकारी आहेत.
कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहायक यांच्या सहयोगाने राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबविणे आणि कृषी उत्पन्न वाढविण्यात मोरे यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न, शेतकरी महिलांना मत्स्य शेतीचे प्रशिक्षण, महिलांना फळ प्रक्रियेचे प्रशिक्षण देणे या कामासोबतच लॉकडाऊन काळात भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेचा’ पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला. शेतकरी ते थेट ग्राहक या क्रांती मोरे यांनी उभारलेल्या चळवळीतील अनेक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्वखुशीने मदत केली. मोरे यांनी शेतकऱ्यांसाठी तळमळीने केलेल्या या अभूतपूर्व, लोकोपयोगी आणि नि:स्वार्थी कार्याची दखल घेऊनच महाराष्ट्र शासनाने त्यांची विखे पुरस्कारासाठी निवड केली. यंदा हा पुरस्कार एका महिला अधिकाऱ्याला मिळाल्याने महिला अधिकाऱ्यांसाठी ही भूषणावह बाब आहे.
................
माझे नाव मोठे व्हावे हा उद्देश ठेवून कधीच काम केले नाही. शेतकऱ्यांचे हित कसे साधता येईल, हाच माझ्या कामाचा उद्देश राहिलेला आहे. यापुढेही अजून चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करीत राहीन. शेतकरी ते थेट ग्राहक ही चळवळ अजून व्यापक करणार आहे.
-क्रांती रवींद्र चौधरी-मोरे, प्रादेशिक साखर संचालक, अहमदनगर
.................
०३ क्रांती मोरे