राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर
By सचिन धर्मापुरीकर | Published: November 30, 2023 06:18 PM2023-11-30T18:18:27+5:302023-11-30T18:19:06+5:30
या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण लोककवी प्रशांत मोरे व लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या हस्ते होणार आहे.
कोपरगाव (जि. अहमदनगर) : भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये नागू विरकर (सातारा), गणपत जाधव (सोलापूर), आप्पासाहेब खोत (कोल्हापूर), मनीषा पाटील (सांगली), प्रवीण पवार(धुळे), डॉ.रवींद्र कानडजे (बुलडाणा), डॉ. मारोती घुगे (जालना) या लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. गणेश देशमुख व सहकार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. संजय दवंगे यांनी येथे दिली. या प्रसंगी ट्रस्टी रमेशराव रोहमारे, शोभाताई रोहमारे, संदीप रोहमारे, ॲड. राहुल रोहमारे व प्राचार्य डॉ. बी.एस. यादव उपस्थित होते.
भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे ग्रामीण साहित्यातील कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह व समीक्षा या साहित्यप्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी २०२२ या वर्षातील पुढील ग्रंथांना पुरस्कार जाहीर केले आहेत.
हेडाम - नागू विरकर (ग्रामीण कादंबरी - समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर), हावळा - गणपत जाधव (ग्रामीण कथासंग्रह - शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा), काळीज विकल्याची गोष्ट- आप्पासाहेब खोत (ग्रामीण कथासंग्रह, ललित पब्लिकेशन, मुंबई) विभागून, नाती वांझ होताना - मनीषा पाटील हरोलीकर (ग्रामीण कविता संग्रह, संस्कृती प्रकाशन,पुणे), भुई आणि बाई - प्रविण पवार(ग्रामीण कविता संग्रह, परिस पब्लिकेशन, पुणे) विभागून, शेतकरी जीवनसंघर्ष : ऐतिहासिक परामर्श - डॉ.रवींद्र कानडजे (ग्रामीण समीक्षा, नाग-नालंदा प्रकाशन, इस्लामपूर, १९८० पूर्वीची ग्रामीण कविता : प्रेरणा आणि प्रवृत्ती - डॉ. मारुती घुगे (ग्रामीण समीक्षा, यशोदीप पब्लिकेशन्स) विभागून प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. कै. के. बी. रोहमारे यांनी स्थापन केलेल्या भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे १९८९ पासून हा उपक्रम राबविण्यात येतो. ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे, हा उद्देश असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी सांगितले.
या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण लोककवी प्रशांत मोरे व लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या हस्ते दि. ७ डिसेंबर रोजी के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव येथे केले जाणार आहे.