नगरमध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा
By Admin | Published: September 18, 2014 11:09 PM2014-09-18T23:09:11+5:302024-10-02T15:42:22+5:30
अहमदनगर : वाडियापार्क येथील जलतरण तलावावर येत्या शनिवारपासून पहिली राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धा होत असून, स्पर्धेत राज्यातील ३० जिल्ह्यातील ४८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे़
अहमदनगर : वाडियापार्क येथील जलतरण तलावावर येत्या शनिवारपासून पहिली राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धा होत असून, स्पर्धेत राज्यातील ३० जिल्ह्यातील ४८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे़ ही स्पर्धा २७४ गटांत होणार असल्याची माहिती नगर जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली़
नगर शहरात प्रथमच जलतरण स्पर्धा होत आहे़ वाडियापार्क येथील जलतरण तलावावर पहिली राज्यस्तरीय स्पर्धा राज्य आणि जिल्हा जलतरण संघटना आणि मास्टर्स अॅक्वेटिक कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे़ शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अनिल कवडे, आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन होणार असल्याचे घुले म्हणाले़
ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे़ या स्पर्धेसाठी राज्यातील ३० जिल्ह्यातील ४८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे़ वयोगट २५ ते ९२ वर्षापर्यंतचे खेळाडू सहभागी होणार असून, स्पर्धेत फ्रिस्टाईल स्ट्रोक, बॅकस्ट्रोक, बटरफ्लाय, स्ट्रोक, वैयक्तिक मिडले, रिले आणि डायव्हींग यांचा समावेश असणार आहे़ स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय मानांकित खेळाडूस अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कास्यपदक प्रदान केले जाणार आहे़
खेळाडूंसह अधिकाऱ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले़ कॅप्टन गजानन चव्हाण, रामदास ढमाले आणि रावसाहेब बाबर पत्रकार परिषदेस उपस्थित होते़
(प्रतिनिधी)