लसीकरणासाठी राज्याचे स्वतंत्र ॲप असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:45+5:302021-05-09T04:21:45+5:30
अहमदनगर : सध्या जिल्ह्यात, तसेच राज्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आता १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील नागरिकांचेही लसीकरण ...
अहमदनगर : सध्या जिल्ह्यात, तसेच राज्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आता १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील नागरिकांचेही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, ॲपवरील तांत्रिक अडचणी, लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी, यामुळे मोहिमेत अधिक सुसूत्रता आणण्याची गरज आहे. वास्तविक, राज्यासाठी असे स्वतंत्र ॲप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. सध्या केंद्र सरकारच्या स्तरावरून लसीकरण संदर्भातील ॲपचे संनियंत्रण होत असल्याने त्यात अनेक अडचणी आहेत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
महसूलमंत्री थोरात यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ.दादासाहेब साळुंके यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी थोरात म्हणाले, सध्या नगर शहर, नगर ग्रामीण आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातही रुग्णवाढीचा वेग मोठा आहे. रुग्णांचे घरी विलगीकरण आता सक्तीने बंद करुन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे आवश्यक आहे. अशावेळी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. सध्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बहुतांशी नागरिक त्याचे पालन करताना दिसत आहेत. मात्र, कोरोना संसर्ग आटोक्यात आणायचा असेल तर सर्वांनीच प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची गरज आहे. शहरी भागात सर्वेक्षण पथकांद्वारे घरोघऱी सर्वेक्षण केले जाणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटात सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असून ही वेळ मतभेदाची नाही. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखली आणि आपण संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर आपोआपच आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
---------
फोटो- ०८ बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुथ हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार डॉ. सुधीर तांबे, देवदान काळकुंबे आदी उपस्थित होते.