राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 05:22 PM2018-09-19T17:22:17+5:302018-09-19T17:35:56+5:30
राज्य साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार व सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे (वय-८५) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
अहमदनगर : राज्य साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार व सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे (वय-८५) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्यांचे आज पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुलगी असा परिवार आहे.
शिवाजीराव नागवडे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. १९७० साली त्यांनी ढोकराईच्या माळरानावर नगर दक्षिणमधील पहिला सहकारी साखर कारखान्याची मुहर्तमढ रोवली. १९७८ आणि १९९५ साली श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदिप शिक्षण संस्था व तुळजाभवानी शिक्षण संस्था सुरु केल्या. या शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील गावागावात शिक्षणाचे जाळे उभे केले. ते राज्य साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष होते. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, स्व. विलासराव देशमुख, वसंतदादा पाटील, शंकरराव कोल्हे, शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.