दूध उत्पादकांचा राज्यव्यापी एल्गार : संघर्ष समितीचे उद्यापासून गावोगावी चावडीसमोर दुग्धाभिषेक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:53 AM2020-07-31T10:53:39+5:302020-07-31T10:54:09+5:30
दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी १ आॅगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुग्धाभिषेक घालून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने शुक्रवारी (३० जुलै) दिली.
अकोले : दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी १ आॅगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुग्धाभिषेक घालून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने शुक्रवारी (३० जुलै) दिली.
दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा, यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकºयांच्या खात्यात वर्ग करा. २६ जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकºयांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करा. जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा. देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्यावे. या मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने २० जुलैपासून राज्यात आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनात शेतकºयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभा व संघर्ष समितीच्या वतीने डॉ.अशोक ढवळे, जीवा गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ.अजित नवले यांनी केली आहे.