राज्यात आघाडीला ३० पेक्षा अधिक जागा मिळतील - जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 03:26 PM2019-04-17T15:26:39+5:302019-04-17T15:26:43+5:30
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाला अकोले वगळता कुठेही यश मिळणार नाही. नितीन गडकरी सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत.
राहुरी : पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाला अकोले वगळता कुठेही यश मिळणार नाही. नितीन गडकरी सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत. विदर्भात भाजपाची ही अवस्था असेल तर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या ३० पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असे सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
कणगर येथे बुधवारी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते. आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, विनायक देशमुख, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, रोहिदास कर्डिले, सुरेश वाबळे, डॉ.उषाताई तनपुरे, बाबासाहेब भिटे, अजित कदम, मनिषा ओहोळ, बाळासाहेब लटके, नंदा गाढे, अॅड.शारदा लगड, प्रमिला कोळसे, सुयोग नालकर उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, मोदींनी सामान्य जनतेला फसवले. इतिहासातील उच्चांकी बेरोजगारी झाली. उरी, पठाणकोट, पुलवामा असे मोठे हल्ले देशावर झाले. कुणीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही. उलट सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. निवडणुकीनंतर एनडीएमधील काही घटकपक्ष शरद पवार यूपीएमध्ये आणतील. पंतप्रधानपद जाईल, या भीतीने मोदी राष्ट्रवादी व पवार यांच्यावर टीका करीत आहेत. यूपीए सरकार सत्तेवर आले तर शेतकऱ्यांना पवार यांच्या व्याख्येतील सरसकट कर्जमाफी दिली जाईल. चार महिन्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येईल. निळवंडे कालव्याची कामे पूर्ण करू. स्व. शिवाजी गाडे यांनी सुजय विखे यांना उमेदवारी देऊ नका, असे सांगितले होते. संग्राम जगताप यांचा विजय पक्का आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
आमदार आव्हाड म्हणाले, मोदी यांच्या सभेनंतर फिरणाºया तीन क्लिपमुळे नगरकरांना शरमेने मान खाली घालावी लागली. नोटाबंदी सर्वात मोठा घोटाळा आहे. शेतकरी आत्महत्या, पाच वर्षात काय केले. यावर मोदी बोलत नाहीत. त्यांनी हिंदू मुस्लिम द्वेष वाढविला. देशाच्या सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे. परंतु, पुलवामा घटनेत ३५० किलो आरडीएक्स कुठून आले. याचे उत्तर देत नाहीत. मोदींचा पराभव केला नाही तर हिटलर पुन्हा जन्माला येईल, असेही आव्हाड यांनी सांगितले.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, दादासाहेब पवार, अजित कदम, अॅड.पंढरीनाथ पवार, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांची भाषणे झाली.