राज्यातील पहिलाच भाजीपाला प्रकल्प
By Admin | Published: August 9, 2014 11:18 PM2014-08-09T23:18:23+5:302014-08-09T23:33:21+5:30
बाभळेश्वर: शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली़
बाभळेश्वर: पणन विभागाच्या वतीने निर्यात सुविधा, निर्जलीकरण, पॅक हाऊस, प्रिकुलिकंग आणि शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली़ राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे राज्यातील पहिला प्रकल्प उभारण्यात आला असल्याचेही ते म्हणाले़
पत्रकार परिषदेत मंत्री विखे म्हणाले, जिरायत भागातील शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून हा राज्यातील एकमेव प्रकल्प आहे़ पणन मंडळामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत प्रवरा फळे, भाजीपाला सहकारी संस्थेच्या पाच एकरावर या प्रकल्पामध्ये फळभाजीपाला प्रक्रिया आणि उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे फलोद्यान प्रशिक्षण उपकेंद्र येथे असणार आहे़ ११ कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. याच ठिकाणी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे यांच्या वतीने फलोद्यान प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजन होणार आहे़ या अंतर्गत येथे दहा एकर क्षेत्रावर एक हजार लक्ष रूपये खर्च करून सर्व सुविधायुक्त शेतकऱ्यांना शेतीचे हायटेक तंत्रज्ञान देणारे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे़ पाच एकरावर तीन शेडनेट हाऊस, पाच पॉलीहाऊस, एक फॅन पॅड पॉलीहाऊस आणि तीन पॉलीहाऊस टनेल असे बारा हरीतगृह व्यावसायिक तत्वावर उभारून त्याद्वारे दरवर्षी दोन हजार ४०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे़, असेही विखे यांनी सांगितले. खडकेवाके प्रकल्पातून उत्पादित पदार्थांना ‘प्रवरा ग्रीज’हे नाव देण्यात आले आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना शाश्वत बाजारपेठ
प्रकल्पामुळे दिवसाला ४० टन मालाची एक शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होईल़ सर्व प्रतीच्या मालाला एकाच छताखाली खरेदी केंद्र उपलब्ध होईल़ प्रकल्पामुळे कृषि मालास हमीभाव आणि कंत्राटी शेतीतून पॉलिहाऊस, शेडनेटसारख्या शेतीला चालना मिळेल़ फळे, भाजीपाल्याच्या काढणी पश्चात तंत्रज्ञानामुळे मुल्यवृद्धी प्रकल्पामुळे ४० जणांना थेट तर २०० पेक्षा जास्त जणांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळेल़ शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल़
रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा होणार आहे़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ़ बाळासाहेब विखे राहतील़ कृषि मंत्री राधाकृष्ण विखे, आदीवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, राज्यमंत्री सुरेश धस, कृषि आयुक्त उमाकांत दांगट, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ़ सुधीरकुमार गोयल, पणनचे कार्यकारी संचालक मिलिंद भाकरे, भाजीपाला संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील आदींची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे़