शेवगाव तालुक्यात आढळल्या चौसष्ट योगिनींच्या मूर्ती, दगडी शिल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:34+5:302021-07-01T04:15:34+5:30

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव तालुक्यातील खांबपिंप्री गावातील बारवेत उत्खननाच्या वेळी प्राचीन काळातील सुबक कोरीव काम केलेल्या चौसष्ट योगिनींच्या मूर्ती, ...

Statues of 64 yoginis, stone sculptures found in Shevgaon taluka | शेवगाव तालुक्यात आढळल्या चौसष्ट योगिनींच्या मूर्ती, दगडी शिल्प

शेवगाव तालुक्यात आढळल्या चौसष्ट योगिनींच्या मूर्ती, दगडी शिल्प

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव तालुक्यातील खांबपिंप्री गावातील बारवेत उत्खननाच्या वेळी प्राचीन काळातील सुबक कोरीव काम केलेल्या चौसष्ट योगिनींच्या मूर्ती, दगडी शिल्प, हेमाडपंथी महादेव मंदिर, महाभारतकालीन रणखांब आदी शिल्प सुस्थितीत नुकतीच आढळून आली आहेत. सातवाहन, वाकाटक, कुंतल, बदामी, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव अशा संमिश्र काळाचा प्रभाव असलेल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा हा अमूल्य ठेवा आहे, असा दावा नगर येथील इतिहास संशोधकांनी केला आहे.

खांबपिंप्रीत प्रवेश करताच, उजव्या बाजूस साडेआठ फूट उंचीचा शेंदराने माखलेला दगडी खांब झुकलेल्या अवस्थेत पाहावयास मिळतो. याच खांबावरून गावाला खांबपिंप्री असे नाव पडले, असे गावकरी सांगतात. महाभारतात अर्जुन व त्याचा मुलगा बभ्रूवाहन यांचे युद्ध झाले होते. त्यावेळी हा रणखांब उभारला होता, तसेच या खांबाचा वरील भाग युद्धाच्या वेळी शेजारील लखमापुरी गावात पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. याच रणखांबाच्या समोरील बाजूस एक मोठी बारव असून, ती बुजलेली आहे. बारवेत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. बारा ते पंधरा फूट बारवेचे अवशेष सुस्थितीत आहेत. अन्य बारव बुजलेली आहे. बारवेत खाली उतरल्यावर चारही बाजूस अतिशय बारीक, सुंदर कोरीव काम केलेल्या योग साधना करताना चौसष्ट योगिनींचे शिल्प आढळून येतात. विशेष बाब म्हणजे, या प्रत्येक मूर्ती बसलेल्या अवस्थेत साधना करतानाच्या आहेत. प्रत्येक योगिनीच्या हातामध्ये जपमाळ व इतर साधने आहेत. येथे काळभैरवाचे दुर्मीळ शिल्प आहे.

बारवेलाजवळच हेमाडपंथी महादेव मंदिर आजही सुस्थितीत आहे.

येथील माजी सरपंच लक्ष्मण भीमाजी पावसे म्हणाले, येथील रणखांब वैशिष्ट्यपूर्ण आहे. रणखांब महाभारतातील अर्जुन त्याचा मुलगा यांच्या युद्धाची खूण असल्याचे ज्येष्ठ लोक सांगतात. गावात आजही खोदकाम करताना गाडगे, मडके, बांगड्या, कौलाचे अवशेष यासह मानवी अस्थी सापडतात. १९८७ साली तत्कालीन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी या ठिकाणी येऊन बारव व खांबाची पाहणी केली होती. त्यावेळी निधी उपलब्ध करून हा ठेवा जतन करू, असे सांगितले होते. मात्र, निधी मिळाला नाही, असे पावसे यांनी सांगितले.

---

लखमापुरीतील रणखांबावर दुर्मीळ कलाकृती...

खांबपिंप्री गावाच्या अगदी लगत असलेल्या लखमापुरी या गावात रणखांबाचा दुसरा भाग आजही सुस्थितीत उभा आहे. या खांबावर सप्तमातृका कोरल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, सप्तमातृका अन्य ठिकाणी बसलेल्या अवस्थेत आढळून येतात. मात्र, या खांबावर त्या उभ्या दर्शविल्या आहेत. अशा खांबावर असे मातृकाचे शिल्प दुर्मीळ मानले जाते.

-------

अधिक संशोधन गरजेचे...

पुरातत्त्व शाखेचे विद्यार्थी तारिक तांबोळी, ऋतुजा कदम, रत्नदीप चेनीगुंड, ऋषिकेश सोनवणे यांच्यासह जिल्हा पुरातन वस्तुसंग्रहालयाचे अधीक्षक संतोष यादव, इतिहास संशोधक प्राध्यापक अमोल बुचुडे यांनी नुकतीच भेट दिली. हा ठेवा अमूल्य व प्राचीन असल्याची पुष्टी देताना गावकरी व प्रशासनाने हा ठेवा जतन करण्यासाठी पुढे आले पाहिजे. याबाबतचे अधिक संशोधन आगामी काळात केले जाईल. त्यामुळे आणखी माहिती उजेडात येईल, असे त्यांनी सांगितले.

----

३० खांबप्रिंपी नावाने फोटो आहेत.

Web Title: Statues of 64 yoginis, stone sculptures found in Shevgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.