मंत्रालयीन आदेशापूर्वीच राहाता तालुक्यातील हनुमंतगावचा वाळूउपसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 05:31 AM2018-06-02T05:31:07+5:302018-06-02T05:31:11+5:30
राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील वाळूउपशाला मुदतवाढ देण्याबाबतच्या नस्तीवर प्रशासकीय कार्यवाही सुरु
अहमदनगर : राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील वाळूउपशाला मुदतवाढ देण्याबाबतच्या नस्तीवर प्रशासकीय कार्यवाही सुरु असल्याचे उत्तर मंत्रालयीन प्रशासनाने दिले आहे. दरम्यान, नगर जिल्हा प्रशासनाने मात्र राज्यमंत्र्यांच्या आदेशाचा संदर्भ देत ठेकेदाराला येथील उपशासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे हा उपसा अधिकृत आहे का? असा संभ्रम आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
मार्च २०११ मध्ये हनुमंतगाव येथील २० हजार ब्रासच्या वाळू उपशाविषयी लिलाव झाला होता. वाळू ठेकेदाराने प्रमाणापेक्षा जास्त खोलीपर्यंत जाऊन वाळूउपसा केल्याच्या तक्रारी झाल्यानंतर तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर ठेक्याला स्थगिती देऊन तहसीलदारांनी ठेकेदारास १ कोटी ७४ लाख रुपयांचा दंड आकारला. ठेकेदाराने महसूल राज्यमंत्र्यांकडे २०१४ मध्ये अपिल केले. अपिलात मंत्र्यांनी या उत्खननास मुदतवाढ देण्याचे अमान्य केले होते. या आदेशाचे पुनर्विलोकन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा शासनास प्रस्ताव पाठविला. त्यावर आदेश करताना राज्यमंत्र्यांनी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत या ठेक्यास मुदतवाढ दिल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्यमंत्र्यांच्या या आदेशाचा हवाला देत नगरचा खनिकर्म विभाग व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या लिलावधारकास वाळूउपशास गत १८ मे पासून परवानगी दिली.