पवारांचा मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:45 AM2019-03-26T10:45:00+5:302019-03-26T10:45:00+5:30
शरद पवारांनी स्वत: नगरमध्ये मुक्काम करुन लोकसभेची व्यूहरचना सुरु केली आहे. पवारांचा मुक्काम पडला म्हटले की राष्टÑवादीच्या सैन्यात हालचाल होते. विरोधकही सावध होतात. ती हालचाल त्यांच्या या दौऱ्याने होणार.
सुधीर लंके
शरद पवारांनी स्वत: नगरमध्ये मुक्काम करुन लोकसभेची व्यूहरचना सुरु केली आहे. पवारांचा मुक्काम पडला म्हटले की राष्टÑवादीच्या सैन्यात हालचाल होते. विरोधकही सावध होतात. ती हालचाल त्यांच्या या दौऱ्याने होणार.
‘मी दुसऱ्यांच्या मुलाचे लाड का करु?’ हे पवार यांनी जाहीरच केले आहे. सुजय विखेंचे लाड करायला आपण तयार नाही, असेच त्यांना म्हणायचे होते. संग्राम यांच्या मोर्चेबांधणीसाठी मात्र ते आले. याचा दुसरा अर्थ असा की संग्राम यांचे लाड पुरविण्याचे त्यांनी मनावर घेतले आहे. अर्थात संग्राम यांनी मागणी न करता त्यांना उमेदवारी मिळाली. बहुधा पक्षानेच त्यांच्याकडे हट्ट करुन लढायला लावले.
नगर मतदारसंघाचे एक वैशिष्ट्य हे की सर्वच उमेदवार हे चाळीशीच्या आतील आहेत. सुजय यांचे वय ३७, तर संग्राम यांचे ३३. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी यांनीही बंडाचा इशारा दिला आहे. सुवेंद्र हेही तरुण आहेत. त्यामुळे ही सर्व तरुणांची लढाई आहे. अर्थात या सर्व तरुण चेहऱ्यांच्या मागे मोठी घराणी व एक परंपरा आहे.
या निवडणुकीत विखे यांना काही प्रश्न विचारले जातील, तसे राष्टÑवादीला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तीनच महिन्यांपूर्वी नगरच्या महापौर निवडणुकीत राष्टÑवादीने भाजपला साथ दिली. त्यावेळी पक्षाचा आदेश डावलून नगरच्या १८ नगरसेवकांनी भाजपला मतदान केले. आमदार संग्राम जगताप यांनीही या नगरसेवकांवर अंकुश ठेवला नाही. या नगरसेवकांवर त्यावेळी राष्टÑवादीने बडतर्फीची कारवाई केली. संग्राम यांच्यावरही पक्षाने नाराजी नोंदवली. आज त्याच राष्टÑवादीवर संग्राम यांना उमेदवारी देण्याची वेळ आली व या नगरसेवकांचे निलंबन मागे घ्यावे लागले. लाड पुरविणे म्हणजे काय? हे पवारांनीच यातून सांगून टाकले आहे.
ही पवारांची युद्धनिती म्हणायची की हतबलता? दोनच महिन्यात राष्टÑवादीला आपली भूमिका बदलावी लागली. प्रचारात या मुद्याचा सामना राष्टÑवादीला करावा लागेल. पवारांनी लक्ष घातले म्हटल्यावर विखे यांना हादरा बसणे स्वाभाविक आहे. त्यामुळे विखे हेही प्रचंड सावध झाले आहेत. ‘मी मुलाचा प्रचार करणार नाही’ असे राधाकृष्ण विखे म्हटले खरे. मात्र, त्यांचा नगर जिल्ह्यातून बाहेर पाय निघायला तयार नाही. त्यांनीही दक्षिणेत मुक्काम ठोकला आहे. त्यांना तर मुलाचे लाड पुरवावेच लागतील.
यशवंतराव गडाख यांच्यासाठी पवारांनी १९९१ मध्ये मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या होत्या. त्या निवडणुकीत पैसा, प्रचार यंत्रणेचा दुरुपयोग असे अनेक आरोप झाले. पुढे आदर्श आचारसंहिताच आली. ती आदर्श आचारसंहिता या प्रचारात किती राहील हे पहायचे. पवारांनी सध्या मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, नगर महापालिकेत भाजपला पाठिंबा देणाºया त्यांच्या नगरसेवकांना पवारांची ही भूमिका मान्य आहे का? हा प्रश्नच आहे. नगरसेवकांचे निलंबन मागे घेतले गेले आणि भाजपचे महापौरही कायम आहेत. लाड पुरविणे म्हणजे काय ? ते बहुधा हेच.