कुटुंबाच्या आधारासाठी हाती घेतले स्टेअरिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:40 AM2019-05-05T11:40:31+5:302019-05-05T11:40:36+5:30
अवघ्या १२ वर्षांची असतानाच तिचे आई वडिलांचे छत्र हरपले. धाकटे बहीण-भाऊ आजी समवेत तिचा जीवनाशी संघर्ष सुरू झाला.
योगेश गुंड
केडगाव : अवघ्या १२ वर्षांची असतानाच तिचे आई वडिलांचे छत्र हरपले. धाकटे बहीण-भाऊ आजी समवेत तिचा जीवनाशी संघर्ष सुरू झाला. काही दिवस आजोबांची पिठाची गिरणी चालवून ती आपल्या कुटुंबाचा आधारवड बनली. नंतर एका खासगी दवाखान्यात काम करून ती चार चाकी गाडी शिकली. अन् आता एक वर्षापासून ती नगरमध्ये स्वत: रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा भक्कम आधार बनली आहे. रिक्षा चालविणे म्हणजे पुरूषांची मक्तेदारी हे तिने आपल्या जिद्दीतून खोटे ठरविले.
अहमदनगरच्या दिल्लीगेट परिसरातील निलिमा नमेश खरारे हे या जिद्दी महिलेचे नाव. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार गेला. आजीने निलिमा व तिच्या लहान भावंडांचा सांभाळ केला. आजोबांची पिठाची गिरणी होती. निलिमा त्या गिरणीत काम करू लागल्या. नंतर मात्र गिरणीतील कामाचा शरीरावर विपरित परिणाम होऊ लागल्याने त्यांनी ते काम सोडले. डॉ. जयंत गाडेकर व डॉ. अनुपमा गाडेकर यांच्याकडे काम करून त्या कुटुंबाचा गाडा ओढू लागल्या. हे काम करतानाच ड्रायव्हिंग क्लास लावून चारचाकी वाहन चालविणे शिकून वाहन परवाना मिळविला. डॉक्टरांचे काम करून एक जुनी मारूती कार त्यांनी घेतली. त्यातून विद्यार्थ्यांची घर ते शाळा अशी वाहतूक करून दोन पैसे कमविण्याचा नवा मार्ग त्यांनी शोधला. त्यातून आर्थिक उत्पन्न वाढल्याचे समाधान मिळू लागले. दरम्यान डॉ. गाडेकर यांची सर्व वाहने त्यांनी शिकून घेतली. यानंतर त्यांनी रिक्षा चालविण्याचे परमिट घेऊन स्वत:च्या रिक्षातून त्यांनी एक वर्षापासून प्रवासी वाहतूक सुरू केली. स्वत:च्या लग्नानंतर लहान बहीण-भावाचेही लग्न झाले. काही दिवसानंतर त्यांचा सांभाळ करणारी आजीही त्यांना सोडून गेली. काही तरी वेगळे करून दाखविणे त्यांचे ध्येय होते.
आता मिळेल तिथे प्रवासी घेऊन त्या आपली रिक्षा चालवितात. त्याशिवाय डॉ. गाडेकरांकडे काम ही सुरू आहे. त्यांचे पती महापालिकेत काम करीत आहेत. मुलगी दहावीला, तर मुलगा सातवीत आहे. मला परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही, पण माझ्या मुलांना मी खूप शिकविणार, अशी निलिमा यांची जिद्द आहे.
रिक्षासाठी रात्रशाळेतून घेतले आठवीचे शिक्षण
निलिमा यांचे शिक्षण परिस्थितीमुळे सातवीतूनच सुटले. रिक्षा चालविण्यासाठी परमिट आवश्यक असल्याने त्यासाठी आठवी शिक्षणाची अट होती. त्यामुळे त्यांनी रात्रशाळेत आठवीच्या वर्गात प्रवेश घेतला. आठवीचे शिक्षण पूर्ण करून रिक्षा चालविण्याचे परमिट मिळविले.
महिला असून रिक्षा कशी चालविता असा प्रश्न त्यांना अनेक जण विचारतात. पण यावर रिक्षा चालविणे अजिबात वाईट नाही, असे त्यांचे ठाम उत्तर असते. रिक्षा व्यवसायातून मिळालेला प्रत्येक रूपया मी कुटुंबाच्या भल्यासाठी सत्कारणी लावते. कोणताच व्यवसाय वाईट नसतो. आता महिला म्हणून मला या व्यवसायाचे काहीच वेगळेपण वाटत नाही. काही वाईट अनुभव येतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून मी पुढे जाते. डॉ. गाडेकर यांच्या कुटुंबांनी मला रिक्षा चालविण्याची प्रेरणा दिली. आता पतीची मला खंबीर साथ आहे. रोजचे ७०० ते ८०० रूपये मी यातून कमावते. मी स्वत: पंक्चर काढायला, टायर बदलण्यास शिकले आहे. आता वाहन दुरूस्तीचे काम शिकत आहे. नगरमध्ये मी एकटीच महिला रिक्षाचालक आहे, याचा मला अभिमान आहे. -निलिमा नमेश खरारे, नगरमधील पहिल्या रिक्षाचालक.