कानिफनाथ समाधी मंदिराच्या कळसाला काठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:13 AM2021-03-29T04:13:56+5:302021-03-29T04:13:56+5:30
तीसगाव : चैतन्य कानिफनाथ महाराज की जय, कान्होबा देव माझा मढीचा, अलख निरंजन, आदेश असा मुखी नाथांचा जयघोष. डफ, ...
तीसगाव : चैतन्य कानिफनाथ महाराज की जय, कान्होबा देव माझा मढीचा, अलख निरंजन, आदेश असा मुखी नाथांचा जयघोष. डफ, ढोल-ताशांच्या निनादात श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे रविवारी सकाळी कैकाडी समाजाची मानाची काठी चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिराच्या कळसाला भेटविण्यात आली.
कानिफनाथ गडनिर्मिती व कानिफनाथांच्या मंदिराच्या निर्मितीतील योगदान लक्षात घेऊन येथील यात्रेत विविध समाजास मान आहे. मानाच्या काठीला ७५० वर्षांची परंपरा आहे, असे मानकरी नारायणबाबा जाधव यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच भाविकांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे नारायणगड ते मढी अशा काठीच्या प्रवासादरम्यान गर्दीची वानवा होती. सूर्योदयाला कैकाडी समाजाचे पाच मानकरी कानिफनाथांच्या दरबारी काठी घेऊन आले. पूजाविधी करून काठी प्रथम नाथांच्या संजीवन समाधी व नंतर कळसाला भेटविण्यात आली. प्रसंगी शंखध्वनी व घोषणांचा निनाद झाला. राजीव जाधव, भाऊ जाधव, हिरामण जाधव, प्रकाश जाधव, गणेश जाधव आदी पायी काठी मिरवणूक आणणाऱ्या सेवकांचा देवस्थान समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड, विश्वस्त भाऊसाहेब मरकड, रवींद्र आरोळे, श्यामराव मरकड, डॉ. विलास मढीकर, कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड आदी उपस्थित होते.
--
२८ मढी
मढी येथे मानाची काठी कानिफनाथ समाधी मंदिराच्या कळसाला लावण्यात आली.