गल्लोगल्ली आली आहे स्वस्तात मरणाची ‘झिंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 06:25 AM2023-04-14T06:25:57+5:302023-04-14T06:26:02+5:30
सध्या राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंड पेये बाजारात आली आहेत.
मच्छिंद्र देशमुख
कोतुळ (जि. अहमदनगर) : सध्या राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंड पेये बाजारात आली आहेत. पानटपरीवर सहज दहा वीस रुपयांत ही पेये मिळत आहेत. यातून सौम्य प्रकारची नशा होत असल्याने लहान मुले, महिला, पुरुषही या ड्रिंक्सच्या आहारी गेले आहेत.
सहज व कमी पैशात हे पेय मिळत असल्याने उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थीही रात्री झोप येऊ नये म्हणून याचा सहारा घेत आहेत. वाहन चालकही मोठ्या प्रमाणात याचे सेवन करत आहेत. याचे सेवन केल्यानंतर झोप येत नाही तर शरीरात स्फूर्ती निर्माण होते. पिल्यानंतर बराच काळ डोळे ताठर होतात आणि बऱ्यापैकी गुंगी येते.
२५० मि.ली.च्या बाटलीत ७५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये, अशी नोंदही या बाटलीवर आहे. शिवाय लहान मुले, गरोदर माता, स्तनदा माता यांना धोकादायक असल्याची स्पष्ट नोंद त्यावर आहे. या बाटल्यांत प्रत्येक १०० मि.ली.ला २९ मिली ग्रॅम कॅफेन असल्याची नोंद आहे. मात्र, या बाटल्या थेट २५० मिलीच्या आहेत. दिवसभरात पाचशे मिलीपेक्षा जास्त घेऊ, नये असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले असले तरीही ही पेये सहज उपलब्ध होत आहेत.
कॅफेन हे शंभर मिली ग्रॅमपेक्षा जास्त शरीरात गेल्यास जास्त नशा येते. मेंदू, किडनी, मज्जारज्जू निकामी होतो. गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या मातांनी हे घेऊ नये. बाळाला अपंगत्व किंवा मानसिक विकलांगता येते. थोड्या प्रमाणात जरी चार-पाच वेळा घेतले तरी त्याचे व्यसनच लागते.
- डॉ. जगदीश वाबळे, एम. डी. मेडिसीन, संगमनेर
कॅफेनयुक्त थंड पेये आढळून आलेली नाहीत. एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफेन असते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
- संजय शिंदे, सहायक आयुक्त,
अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर