जवळा येथील सराफ दुकानात चोरी : १५ किलो चांदी, ५ ग्रॅम सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 06:44 PM2019-01-10T18:44:33+5:302019-01-10T18:45:06+5:30
जवळा येथील वरद लक्ष्मी ज्वेलर्सचे शटरचे सेंटर लॉक तोडून दरोडेखोरांनी दुकानातील १५ किलो चांदी, ५ ग्रॅम सोने व रोख १२ हजार रूपये लांबविले. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास हा दरोडा पडला.
जामखेड : जवळा येथील वरद लक्ष्मी ज्वेलर्सचे शटरचे सेंटर लॉक तोडून दरोडेखोरांनी दुकानातील १५ किलो चांदी, ५ ग्रॅम सोने व रोख १२ हजार रूपये लांबविले. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास हा दरोडा पडला.
जवळा येथील शिवानंद सुभाष कथले यांचे जवळा ग्रामपंचायतीशेजारी मेनरोडवर वरद लक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान आहे. दुकान चालक कथले नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक कटावणीने तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील १५ किलो चांदी व सोन्याच्या मुरणीचे पाच बॉक्स, एक नथ बॉक्स तसेच गल्ल्यातील रोख १२ हजार रूपये घेऊन दरोडेखोर फरार झाले. यानंतर दरोडेखोरांनी काही अंतरावरील दयानंद कथले यांच्या सोन्याच्या दुकानाकडे मोर्चा वळविला. परंतु तेथे सीसीटीव्ही कॅमेरा दिसताच ते परत माघारी गेले. त्यामुळे दुसरे ज्वेलर्सचे दुकान दरोडेखोरांपासून वाचले. दयानंद कथले यांच्या शेजारच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दरोडेखोरांचे चित्रण झाले. गुरूवारी पहाटे ७ वाजता शिवानंद कथले यांच्या दुकानासमोरून जाणाºया काही नागरिकांना दुकानाचे शटर अर्धवट अवस्थेत दिसल्याने त्यांनी कथले यांना माहिती दिली. कथले यांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस, ठसे तज्ज्ञ व श्वान पथक आल्यानंतर दुकानात पंचनामा करण्यात आला. श्वानपथकाने दुकानापासून ५० मीटर अंतरापर्यंत माग दाखविला. दुपारी बाराच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले.