शेवगाव आगाराच्या 3 एसटी बसेसवर दगडफेक, पोलीस बंदोबस्त नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 11:33 AM2021-11-27T11:33:24+5:302021-11-27T11:41:15+5:30
विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता.
शेवगाव (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला होता. दरम्यान, शुक्रवारी पैठण, शनिवारी सकाळी अहमदनगर व श्रीरामपुर कडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी बसेसवर अज्ञात ईसमाकडून दगडफेक करण्यात आली असून या प्रकारामुळे कर्मचारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता. मात्र, शनिवारी सकाळी बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही. शेवगाव कडून अहमदनगरकडे जाणारी बस क्रमांक एमएच ४० वाय ५४२८ या गाडीवर अज्ञात इसमाने तालुक्यातील अमरापूर येथे मागील बाजूस दगड मारल्याने काच फुटली आहे. श्रीरामपुर कडे जाणारी बस क्रमांक एमएच ४० एन ८८९५ वर सौंदळा ( भेंडा नेवासा), तसेच शुक्रवारी सायंकाळी पैठणकडे जाणाऱ्या एमएम ४० एम ८७५२ या बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये चालक नामदेव खंडागळे हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, एसटी सुरु झाल्याने प्रवाशी व विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत असून संप मागे घेत एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र, विविध ठिकाणी दगडफेक सारखे प्रकार घडत असल्याने कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.