शेवगाव शहरात दगडफेक अन् जाळपोळ, पोलिसांकडून लाठीचार्ज: चार पोलिस कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 11:38 PM2023-05-14T23:38:50+5:302023-05-14T23:39:45+5:30

पुढील चार दिवस जमावबंदी लागू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचा विचार सुरु आहे.

Stone pelting and arson in Shevgaon town, lathi charge by police: Four police personnel injured | शेवगाव शहरात दगडफेक अन् जाळपोळ, पोलिसांकडून लाठीचार्ज: चार पोलिस कर्मचारी जखमी

शेवगाव शहरात दगडफेक अन् जाळपोळ, पोलिसांकडून लाठीचार्ज: चार पोलिस कर्मचारी जखमी

उमेश घेवरीकर
शेवगाव (जि. अहमदनगर) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान मिरवणूक व प्रार्थनास्थळ यावर दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. जमावाने दुकानांचे व वाहनांचे नुकसान करुन काही प्रमाणात जाळपोळही केली. पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात चार पोलीस जखमी झाले आहेत.

शहरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी होते. मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने एका गटाने दगडफेक केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली. यामुळे अफवांना पीक येऊन दोन्ही बाजूने दगडफेक झाली. त्यामुळे पळापळ झाली. गोंधळामुळे व्यावसायिकांनी दुकाने पटापट बंद केली. जमावाने यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली गेली.

यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. दगडफेकीत चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार छगन वाघ, प्रांताधिकारी प्रसाद मते घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटकेही तत्काळ शहरात दाखल झाले आहेत. नगरहून अप्पर पोलीस अधीक्षक वसंत खैरेही शेवगावच्या दिशेने रात्री उशिरा रवाना झाले. परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहे, असे प्रांताधिकारी मते व उपअधीक्षक मिटके ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. पुढील चार दिवस जमावबंदी लागू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचा विचार सुरु आहे.

 

Web Title: Stone pelting and arson in Shevgaon town, lathi charge by police: Four police personnel injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.