नगरपालिकेला बदनाम करण्याचे कारस्थान थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:02+5:302021-08-20T04:26:02+5:30
पाथर्डी : भगवानगड पाणी योजनेच्या विषयावर आता तुम्ही बोलायला लागलात. तुम्हाला त्यात समाविष्ट गावांची नावे तरी माहीत आहेत का? ...
पाथर्डी : भगवानगड पाणी योजनेच्या विषयावर आता तुम्ही बोलायला लागलात. तुम्हाला त्यात समाविष्ट गावांची नावे तरी माहीत आहेत का? पालकमंत्र्यांच्या बैठकीला पोलीस छावणीचे स्वरूप का आणले? पाच वर्षांत शहरात विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला. आरोप करताना भान ठेवा व पालिकेला बदनाम करण्याचे कारस्थान थांबवा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांना केले. शहरातील रामगीरबाबा टेकडीवरील पाण्याच्या टाकी तसेच नाथनगरमधील मुख्य रस्त्याच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सतीश गुगळे होते. व्यासपीठावर पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, राहुल राजळे, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, बजरंग घोडके, मंगल कोकाटे, काशीबाई गोल्हार, महेश बोरुडे, प्रवीण राजगुरू, रमेश गोरे, रामनाथ बंग, अजय भंडारी आदींची उपस्थिती होती.
राजळे म्हणाल्या, विरोधकांना विकासातील काही कळत नाही. भाजप सरकारच्या काळात तालुक्यासाठी व शहरासाठी मोठा निधी आणला. त्यातून आजची कामे सुरू होत आहेत. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले.
----
...तर १४ नगरसेवक राजीनामा देतील
नगराध्यक्ष गर्जे म्हणाले, कसबा पेठेत पत्र्याचे छत उभारले. स्लॅबचे बिल काढल्याचा आरोप आमच्यावर केला. पुरावा दाखवा सिद्ध झाले, तर माझ्यासह १४ नगरसेवक राजीनामे देऊ. तुमच्यासारखी पालिकेच्या खुल्या जागा बळकाविण्यासाठी आम्हाला सत्ता नको आहे. काही नसताना उगाच आरोप करून शहरातील नागरिकांची दिशाभूल करणे थांबवा; अन्यथा यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल.