सक्तीची कर वसुली थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:19 AM2021-03-19T04:19:40+5:302021-03-19T04:19:40+5:30
शिर्डी : नगरपंचायतीने सक्तीने करण्यात येणारी मालमत्ता कर व गाळा भाडे वसुली थांबवावी. शासनाकडे करण्यात आलेल्या कर सवलतीसाठीच्या प्रस्तावाचा ...
शिर्डी : नगरपंचायतीने सक्तीने करण्यात येणारी मालमत्ता कर व गाळा भाडे वसुली थांबवावी. शासनाकडे करण्यात आलेल्या कर सवलतीसाठीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपच्या वतीने करण्यात आली.
भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दीपक वारुळे, सुधीर शिंदे, योगेश गोंदकर, गणेश सोनवणे, प्रसाद शेलार, सागर जाधव, आदींचा शिष्टमंडळाने मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांची गुरुवारी भेट घेतली. याबाबत त्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत शहरातील मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळा भाडे, आदींची वसुली करीत आहे. वर्षभरापूर्वी १७ मार्च २०२० ला साई मंदिर दर्शनासाठी बंद झाले. शिर्डी शहरात लॉकडाऊन सुरू झाला. महाराष्ट्र शासनाने १६ नोव्हेंबरपासून व्यवहार काही प्रमाणात सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले असले तरी शिर्डीत अघोषित लॉकडाऊनसारखीच परिस्थिती आहे. मध्यंतरी शिर्डी नगरपंचायतीने वरील करांमध्ये सवलत मिळावी म्हणून ठराव केला आहे. तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. शिर्डीतील व्यावसायिकांची सध्याची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावलेली आहे. त्यामुळे सक्तीने होणारी कर वसुली बंद करावी, अशी विनंती भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
...
१८शिर्डी निवेदन
..
ओळी - नगरपंचायतीने सक्तीने करण्यात येणारी मालमत्ता कर व गाळा भाडे वसुली थांबवावी, या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना देताना भाजपचे पदाधिकारी.