कृषी पंपाची विज तोडणी थांबवा अन्यथा आंदोलन - चंद्रशेखर घुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:50 PM2017-10-28T16:50:14+5:302017-10-28T16:50:24+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा, खंडित करण्याची मोहीम थांबवावी. कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खाती वर्ग केल्याशिवाय वीज बिल मागू नये. अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडा ( नेवासा) : अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा, खंडित करण्याची मोहीम थांबवावी. कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खाती वर्ग केल्याशिवाय वीज बिल मागू नये. अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली आहे .
घुले पुढे म्हणाले, सोमवार ३० आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदारांना याबद्दल निवेदन देणार आहे. गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यात थकीत वीज बिल वसुलीच्या नावाखाली कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात भीषण दुष्काळ होता. त्यामुळे शेतीला तर सोडाच पिण्याचे पाणी ही उपलब्ध नव्हते. त्यामुळे शेती ओस पडली. कृषी पंप बंदच राहिलेत. वीज वापरलीच नाही तर मग थकबाकी आली कोठून, राज्यातील शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन उतारे कोरे करावेत, शेतक-्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्ने तीन वर्षे सातत्याने आंदोलने करून, शासन दरबारी पाठपुरावा केला. यावर्षी चांगला पाऊस झाला. शेतात थोडी फार पिके उभी राहिलेत. म्हणजे शेतक्यांच्या हातात लगेच पैसे येतात का ? पावसाने उघडीप दिल्याने. शेतात उभी असलेली पिके आता पाण्यावर आली असतानाच. महावितरणने वीज तोडणी मोहीम सुरू केली. त्यामुळे पिके जळून शेतक-यांचे मोठे नुकसान होईल. राज्य सरकारने अगोदर कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी. मगच कृषी पंपाचे वीज बिलाची मागणी करावी.तो पर्यंत शेतीचा वीज पुरवठा खंडीत करू नये. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा घुले यांनी दिला