मृतदेह रस्त्यावर ठेऊन संतप्त नागरिकांचा रास्ता रोको; पादचारी महिला अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 05:18 PM2020-02-16T17:18:07+5:302020-02-16T17:19:01+5:30
अरणगाव बायपासवरील नाटमळा परिसरात पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना समजल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
केडगाव : अरणगाव बायपासवरील नाटमळा परिसरात पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना समजल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
इंदूबाई सखाराम शिंदे (वय ७२, रा. अरणगाव, ता. नगर) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. नाटमळा परिसरातील इंदूबाई शिंदे ही महिला पहाटे सहावा वाजता फिरायला गेली होती. रस्ता ओलांडत असताना सोनेवाडीकडून वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने महिलेला धडक दिली. महिलेचा जागीच मृत्यू झाला. बायपासवर यापूर्वी खड्डे असल्याने अपघात होत होते. आता रस्त्याची दुरुस्ती झाल्याने वाहने वेगात जातात. नाटमळा परिसरात स्पीडब्रेकर बसविण्याची ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली होती. मात्र बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. अखेर येथे महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेऊन रास्ता रोको आंदोलन केले. काही वेळातच पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी गावक-यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गावक-यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.