आणेवारी कमी करण्यासह इतर मागण्यांसाठी बोधेगाव ग्रामस्थांचे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 03:03 PM2018-10-05T15:03:02+5:302018-10-05T15:03:18+5:30
आणेवारी कमी करावी, दुष्काळ जाहीर करून जनावराच्या चा-यासाठी छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करावा आदि प्रमुख मागण्यासाठी शेतक-यांनी बैलगाडीसह आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
बोधेगाव : आणेवारी कमी करावी, दुष्काळ जाहीर करून जनावराच्या चा-यासाठी छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करावा आदि प्रमुख मागण्यासाठी शेतक-यांनी बैलगाडीसह आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.
बोधेगाव परिसरात अत्यंत कमी स्वरुपात पडलेल्या पावसामुळे बहुतांशी क्षेत्र नापिक झालेले आहे. गावाच्या उत्तरेकडील भागात पाऊसच नाही तर दक्षिणेकडील भागात झालेल्या अल्प पावसावर केलेल्या पेरण्या जळाल्या आहेत. पाऊस नसल्याने रब्बी पेरण्याही खोळंबल्या असतानाच प्रशासनाने यंदाची नजर अंदाज पैसेवारी ५४ इतकी जाहीर केली आहे. वास्तवात पैसेवारी १० पैशांइतकीही इतकी जाहीर करावी. शेतक-यांना दुबार पेरणीसाठी अनुदानावर बी-बियाणे, खते उपलब्ध करून द्या, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा. गाव हद्दीतील वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु करा. अशा मागण्या करत माजी उपसरपंच भाऊराव भोंगळे, कुंडलिक घोरतळे, प्रमोद तांबे, माणिक गर्जे, विष्णु वारकड, पाटिलबा तांबे, विजय पाटील घोरतळे, माजी सरपंच विष्णु वारकड आदींनी भाषणे केली.
खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विकास घोरतळे, शिवाजीराव पवार, अनिल घोरतळे, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद शिंदे, गहिनीनाथ बडे, आकाश दसपुते, सिकंदर सय्यद, राजेंद्र भोंगळे, भागवत भोसले, अर्जुन झांबरे, बाळासाहेब घोरतळे, बाळासाहेब काशिद आंदोलनात सहभागी झाले होते.