तूर खरेदी गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी पाथर्डीत रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2017 12:27 PM2017-05-05T12:27:21+5:302017-05-05T12:28:20+5:30
पाथर्डी बाजार समितीचे संचालक, व्यापारी यांची चौकशी करावी, या मागणीसाठी पाथर्डीतील नाईक चौकात शुक्रवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला़
आॅनलाइन लोकमत
पाथर्डी (अहमदनगर), दि़ 5 - पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील तूर खरेदी उपकेंद्रात तूर खरेदीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत पाथर्डी बाजार समितीचे संचालक, व्यापारी यांची चौकशी करावी, या मागणीसाठी पाथर्डीतील नाईक चौकात शुक्रवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला़
पाथर्डी येथील तूर खरेदी केंद्रामार्फत तिसगाव येथे तूर खरेदीसाठी उपकेंद्र सुरु करण्यात आले होते़ या उपकेंद्रात शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी करुन पुणे येथील शासकीय गोदामात पाठविण्यात आली़ त्यापैकी दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत़ परंतु अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही़ त्यामुळे खरेदी केलेल्या सर्व तुरीची, बाजार समितीच्या संचालकांची व व्यापाऱ्यांची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी सुमारे तीन तास रास्ता रोको करण्यात आला़ माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, पंचायत समितीचे उपसभापती विष्णूपंत अकोलकर, शुभम गाडे, आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, नगरसेवक प्रविण राजगुरु, बांदकाम समितीचे सभापती रमेश गोरे, रविंद्र वायकर, एकनाथ आटकर, गोकुळ दौंड यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला़
या प्रश्नांमुळेच तूर खरेदीत संशयकल्लोळ
१) तिसगाव बाजार समितीत तूर खरेदी उपकेंद्रात शेतकऱ्यांकडील तूर खरेदी करण्यात टाळाटाळ का करण्यात येत होती?
२) पुणे येथील शासकीय गोदामाला पाठवलेल्या दोन ट्रक अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्या़ परंतु अद्याप गुन्हा का नोंदवला नाही?
३) ताब्यात घेतलेले दोन ट्रक नेमके कोणत्या व्यापाऱ्याकडून व कुठून भरले, याची चौकशी का होत नाही?
४) २३ ते २५ एप्रिलदरम्यान तहसीलदारांनी सर्व गाळे सील केले होते़ तरीही या कालावधीत वखार महामंडळाला जाण्यासाठी ट्रक कोणाच्या आदेशावरुन भरल्या?, असे अनेक प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले आहेत़