मिरी, घोडेगाव येथे रास्ता रोको
By Admin | Published: September 10, 2014 11:31 PM2014-09-10T23:31:57+5:302023-10-27T15:36:59+5:30
करंजी : गोरख रावसाहेब झाडे या तरुणाच्या मारेकऱ्याचा तातडीने तपास करावा, या प्रमुख मागणीसाठी मिरी ग्रामस्थ व सर्वपक्षीयांच्यावतीने बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
करंजी : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील गोरख रावसाहेब झाडे या तरुणाच्या मारेकऱ्याचा तातडीने तपास करावा, या प्रमुख मागणीसाठी मिरी ग्रामस्थ व सर्वपक्षीयांच्यावतीने बुधवारी सकाळी नऊ वाजता तिसगाव-मिरी मार्गावर तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गोरख झाडे (वय २२) या तरुणाचा चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना पंधरा दिवसापूर्वी घडली होती. त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी घटनेचा बहात्तर तासात तपास करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तपासात काहीच प्रगती होत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून पाथर्डी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर टीका केली. घटनेचा तातडीने तपास न लागल्यास जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा आत्माराम झाडे, एकनाथ झाडे, डॉ. बबनराव पुरनाळे यांनी दिला.
घटनेतील मुख्य आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांची कामगिरी सिध्द करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते कारभारी गवळी, युवा नेते अमोल वाघ यांनी केली. सेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे यांनी घटनेचा निपक्ष:पातीपणे तपास करुन खऱ्या आरोपींना अटक करावी मात्र घटनेकडे कोणीही राजकीय हेतूने पाहू नये, असे सूचित केले.
आंदोलनात राहुरीचे नगरसेवक नंदकुमार तनपुरे, राहुरी तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अशोक कदम, मिरीचे सरपंच रमेश मिरपगार, ज्येष्ठ नेते साहेबराव गवळी, बंडू झाडे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)
घोडेगावचे आंदोलन ;
१५० जणांविरुध्द गुन्हा
सोनई: कांदाप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी नगर- औरंगाबाद राज्य मार्गावर केलेल्या रास्ता रोको आंदोलनप्रकरणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांच्यासह १५० जणांविरुध्द सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पो.कॉ. काकासाहेब मोरे यांनी फिर्याद दिली. गैरकायदा मंडळी जमवून कांदा आयात बंद करुन निर्यात चालू करावी, या मागणीसाठी नगर-औरंगाबाद राज्यमार्गावरील वाहने अनधिकृतपणे अडविली म्हणून या सर्वाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अनिल बेहेराणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मोकाटे करीत आहेत. (वार्ताहर)
पोलिसांची विनंती;
आंदोलनकर्ते आक्रमक
चार हजार मोबाईलचे लोकेशन तपासले आहेत. आरोपींना लवकरच जेरबंद करणार असून त्यासाठी काही अवधी द्या, अशी विनंती पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी केली. परंतु वरिष्ठ पोलीस अधिकारी आल्याशिवाय रस्त्यावरुन उठणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. दरम्यान, अनमुलवार यांनी पुन्हा विनंती केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सामंज्यस्याची भूमिका घेत आंदोलन मागे घेतले.
महिलाही रस्त्यावर
रास्ता रोको आंदोलनात महिलांची उपंिस्थती लक्षणीय होती. घटनेचा तपास लवकर न लागल्यास महिलांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्षा अनिता वेताळ यांनी दिला.